औरंगाबाद - धावणी मोहल्ला भागातील विठ्ठल रुक्मिणी हे मंदिर तीनशे वर्ष जुने आहे. या मंदिराची एक वेगळीचं आख्यायिका आहे. 1928 साली पहिल्यांदा प्लेगमुळे विठ्ठल रुक्माई मंदिराची परंपरा खंडित झाली होती. त्यानंतर आता कोरोनाच्या जागतिक संकटामुळे 92 वर्षानंतर पुन्हा विठ्ठल रुक्माई मंदिराची परंपरा खंडित झाली, अशी माहिती राजीव जहागिरदार यांनी दिली.
आषाढ शुद्ध चतुर्थीपासून एकादशी उत्सवाला सुरुवात होते. यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह यासह विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. आषाढी एकादशीला या सप्ताहाची सांगता होते. त्याच दिवशी पांडुरंगाला महापूजेसह महाअभिषेक करण्यात येतो. दरवर्षी सायंकाळी पाच वाजता पांडुरंगाची पालखी निघते. पालखी गांधी पुतळा संस्थान गणपती किराणा चावडी पंदरिबा मछली खडक मार्गे मंदिराकडे येते. मात्र, यंदा पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती पुजारी यांनी दिली. तसेच दरवर्षी द्वादशीला ब्राह्मणभोजन द्वितीयेला काला आणि पुन्हा चतुर्थीला सत्यनारायणाची पूजा करून संपूर्ण उत्सवाची सांगता होते.
यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे चतुर्थीपासून हरिनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. झांज वाजून पुजारी यांनी मंत्राचा जप संपूर्ण सप्ताह केला. एकादशीला महापूजा व महाअभिषेक करून पुढील सर्व कार्यक्रम पुजारी यांच्या मार्फत करण्यात आल्याची माहिती विठ्ठल रुक्माई मंदिराचे पुजारी राजीव जहागिरदार यांनी दिली. तसेच भक्तांसाठी आजही बाहेरून दर्शन घेण्याची मुभा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.