औरंगाबाद - क्रांती चौकातून कोकणवाडी चौकाच्या दिशेने भरधाव जाणारी कार कमानीच्या कॉलमवर धडकून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अथर्व आशुतोष नावंदर (वय २४, रा.बन्सीलालनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात इतका भयंकर होता, की एअर बॅग उघडून देखील स्टेअरींग पुर्णपणे कार बाहेर पडले होते. मंगळवारी (दि.२२) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.
जागीच मृत्यू
बन्सीलाल नगरातील अथर्व मुंबईला शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद असल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी तो घरी परतला होता. अथर्व नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील क्रांती चौकातील जीममध्ये कारने गेला होता. मात्र, त्याने साडेपाचच्या सुमारास घरी जाण्यासाठी तो निघाला. मित्राला क्रांती चौकात सोडून तो बन्सीलाल नगरच्या दिशेने निघाला. गोपाल टी चौक ओलांडताच अचानक वळणावर त्याचा ताबा सुटला. त्यामुळे कार थेट रस्त्यावरील दिशादर्शक फलकाच्या डाव्या बाजूला असलेल्या खांबावर जाऊन आदळली. यात कारच्यासमोरील बाजूचा अक्षरक्ष: चुराडा झाला. या अपघातात अर्थवचा जागीच मृत्यू झाला.