औरंगाबाद - पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत केंद्रालगत सेल्फी घेत असताना तोल गेल्याने युवक गोदावरी नदीच्या प्रवाहात वाहुन गेल्याची घटना घडली आहे. हा तरुण शेवगाव येथील असून, असिफ जैनुद्दीन शेख (२२) असे त्याचे नाव आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास तरुणाचा मृतदेह शोधण्यात बचाव यंत्रणेला यश आले.
सध्या जायकवाडी धरण पूर्ण भरलेले असून धरणाच्या सोळा दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून सोडलेले पाणी पाहण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या पर्यटकांची धरणावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
हेही वाचा साताऱ्यात मुसळधार पाऊस, माण नदीत एक जण बुडाला
रविवारी(दि.२९ सप्टेंबर)ला दुपारी शेवगाव येथील युवक असिफ जैनुद्दीन शेख हा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत केंद्राजवळ सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन पाण्यात पडला.
हेही वाचा पूर आलेल्या नदीच्या काठावर सेल्फी घेणारा तरुण गेला वाहून; वाशिममधील घटना
यावेळी पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी नगरपालिका अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन दलाचे जयसिंग सांगळे, खलिल धांडे, औरंगाबाद मनपा अग्निशमन दलाचे आर.के. सुरे, मोहन मुंगसे, मनोज राठोड, किरण पागोरे, राम सोनवणे,इ. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली. मात्र, युवकाचा शोध लागला नव्हता. आज सकाळी शोध यंत्रणेला तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले.