औरंगाबाद - फुलंब्रीकडून हर्सूलमार्गे शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेने बुधवारी (दि.24 जून) सकाळी जुना टोल नाका हर्सूल येथून अटक केली आहे.
विकास अंकुश सपकाळ (वय- 24 वर्षे, रा. वालसावंगी, जि. जालना), असे आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून 7 किलो 300 ग्राम गांजा आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फुलंब्रीमार्गे एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी शहरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी जुना टोल नाक्यापाशी सापळा रचला. साडे बारा वाजण्याच्या सुमारास विकास त्याच्या मोटरसायकल (एम एच 28 क्यू 1492) वरुन फुलंब्रीमार्गे शहराकडे येत होता. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले. त्याच्याकडील साहित्य तपासत असताना त्याच्याकडे पांढऱ्या गोणीत गांजा आढळून आला. त्याला तत्काळ ताब्यात घेत त्याच्यावर एन.डी. पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारावाई सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, सहायक फौजदार नितीन मोरे, पोलीस नाईक भगवान शिलोते, पोलीस शिपाई वीरेश बने, विशाल पाटील, आनंद वाहूळ, संदीप क्षीरसागर, संजय जाधव, नितीन देशमुख, चकल कांबळे यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - कोरोना स्थितीला राज्य सरकार जबाबदार, रावसाहेब दानवेंचा आरोप