औरंगाबाद - लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता यांनी नवीन नियमावली लागू केली आहे. यात ज्यामध्ये "नो लस नो दारू" असे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे नवा पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. (no vaccine no drink aurangabad)
नो पेट्रोल नंतर नो दारू -
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (aurangabad collector sunil chavan) यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी नवीन प्रयोग जिल्ह्यात सुरू केले आहेत. मागील आठवड्यात लस नाही घेतली तर पेट्रोल मिळणार नाही, असे निर्देश लागू केले. त्यामुळे नागरिकांमध्ये थोडा धाक बसला आणि लसीकरणाच करवून घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता लस नाही तर दारू मिळणार नाही, असे नवे आदेश देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी बुधवार दि 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मास्क आणि लस घेतलेले प्रमाणपत्र नसेल तर दारू देण्यात नकार देण्यात येत आहे.
वाइन शॉप असोसिएशन करणार मदत -
कोरोना आजाराला हरवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नव्या आदेशाचे वाईन शॉप आणि बार असोसिएशनतर्फे स्वागत करण्यात आले. त्याबाबत अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, व्यवसायाचे स्वरुप पाहता अनेक ग्राहक दारू न दिल्यास भांडण करू शकतात. शिवीगाळ करू शकतात. त्यामुळे नियम पळताना काही प्रमाणात चुका होऊ शकतात. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने कारवाई करताना थोडा विचार करावा, असे मत वाईन शॉप असोसिएशन अध्यक्ष महेश कोल्हे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - औरंगाबाद - बैल चोरांच्या दहशतीने बळीराजा त्रस्त; जागून काढावी लागते रात्र
पेट्रोल पंप चालकांनी दर्शवला विरोध -
"लस नाही तर पेट्रोल नाही" जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला पेट्रोल डीलर असोसिएशनने विरोध केला आहे. पेट्रोल अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे नवीन नियमाची अंमलबजावणी करण्यात अडचणी आहेत. शासनाने स्वतःची यंत्रणा पेट्रोल पंपवर लावल्यास आम्ही सहकार्य करू, अशी भूमिका पेट्रोल डीलर असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी मांडली. मात्र, नियमांची अंमलबजावणी केली नाही म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बाबा पेट्रोल पंप सील केले. या कारवाईमुळे पेट्रोल पंपचालक संतप्त झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका पेट्रोल डीलर असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी मांडली.