वैजापूर ( औरंगाबाद ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या दोन पुतण्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे चिकटगावकरांनी 'घड्याळाला' सोडचिठ्ठी देऊन ठाकरेसेनेची 'मशाल' हाती घेण्याचा निर्णय घेतला ( Bhausaheb Patil Chichtgaonkar In Thackeray group ) आहे. दरम्यान 14 डिसेंबर रोजी मुंबई येथे 'मातोश्रीवर' पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिकटगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले ( Joining Presence Of Uddhav Thackeray ) आहे.
जून महिन्यापासून प्रवेशरखडला : काँग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्यासह त्यांचे पुतणे उल्हास ठोंबरे व पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे कवित्व जून महिन्यापासून सुरू (Chichtgaonkar nephew joins NCP ) होते. हा प्रवेशसोहळा रोखण्यासाठी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतू हा प्रवेशसोहळा रोखण्यासाठी त्यांना यश आले नाही. गेल्या महिन्यातच चिकटगावकरांना डावलून ठोंबरे काका - पुतण्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबई येथे त्यांना प्रवेश देऊन चिकटगावकरांना सणसणीत चपराक दिली. या प्रवेशसोहळ्याचे खापर चिकटगावकरांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर फोडून त्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.
मशाल हाती घेण्याचा सल्ला : चिकटगावकर व समर्थकांचा त्यासाठी पहिल्यापासूनच टोकाचा विरोध होता. परंतू विरोधासाठी केलेली त्यांची झूंज अपयशी ठरल्यानंतर त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क मोहीम सुरू केली. मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या दौऱ्यात त्यांना मतदारांनी ठाकरेसेनेची 'मशाल' हाती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चिकटगावकरांनी त्या दिशेने पावले उचलण्यास सुरवात करून ठाकरेसेनेच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यावरून चिकटगावकरांना ठाकरेसेनेत प्रवेश करण्याचे संकेत मिळाले. ठाकरेसेनेचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची पक्षप्रवेशासाठी अनुकुलताही तेवढीच महत्त्वाची असल्यामुळे आतापर्यंत 'जुळवाजुळव' सुरू होती. या पक्षप्रवेशासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शिष्टाई महत्त्वाची ठरली. अन् स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनीही सहमती दर्शविल्याने चिकटगावकरांना पक्षप्रवेश सोपा झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरेसेनेची आघाडी झाली तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नाही. कारण गेल्या निवडणूकीत ठाकरेसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली होती. त्यामुळे चिकटगावकरांनी पुढील राजकीय आडाखे बांधून हा प्रवेश करण्याचे ठरविले असल्याची चर्चा आहे.