औरंगाबाद - शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत पैठणला येणाऱ्या वारकरी नाथ महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होतात. परंतू जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे नाथ षष्ठी यात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे शेकडो किलोमीटर चालत आलेल्या वारकऱ्यांनी जड अंतकरणाने कोरोनापासून मानव जातीला वाचवण्याची प्रार्थना करत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
तीन दिवस चालणारी नाथ षष्ठी यात्रा 14 मार्चला सुरू झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी नाथ वंशजांसोबत आलेले मानकरी नगर प्रदक्षिणा करतात. रात्री छबिना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरी दिंडी आणि शेवटच्या दिवशी काल्याचा प्रसाद घेऊन यात्रेचे विसर्जन होते. अशी या यात्रेची परंपरा आहे. या परंपरेत खंड न पडू देता नाथ वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी आहे त्या परिस्थितीत सोहळा साजरा करण्याचे आवाहन वारकऱ्यांना केले.
हेही वाचा - "कोरोनाच्या नावाखाली केंद्र सरकारला देशात अराजकता माजवायचीय"
कोरोनामुळे यंदा नाथ भक्तांची संख्या कमी असल्याने गोदामाईचे वाळवंट वारकर्यांविना वांजोटे दिसत होते. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक आपल्या दिंड्या घेवून या वाळवंटात तीन दिवसासाठी आपले बस्तान मांडायचे. भजन, कीर्तन टाळ मृदंगाच्या गजरात अख्खे शहर दुमदुमून जायचे. मात्र, यावर्षी जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या भितीपोटी चारशे वर्षाची परंपरा असलेली नाथ षष्ठी यात्रा अधिकाऱ्यांच्या आदेशाने रद्द करण्यात आली. महाराष्ट्र भरातून गेल्या पंधरा दिवसांपासून पायी वारी करणाऱ्या भाविकांनी दर्शन घेवून आपली कीर्तन सेवा नाथ चरणी अर्पण करुन निरोप घेतला.
हेही वाचा - कोरोनाचा प्रभाव; 'या' कालावधीदरम्यान खंडपीठेही राहणार बंद
यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. याची माहिती प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके दिली. दर्शनासाठी भाविक येत असल्याने शहरात गर्दी होवु नये म्हणून पैठण शहरात येणाऱ्या मार्गावर आणि पंचायत समितीकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस प्रशासनाच्यावतीने बॅरिकेट लावण्यात आले होते.
यावर्षी नाथ संस्थांकडून समाधी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईत चलचित्रांसह शिवाजी महाराज आणि नाथ महाराजांच्या देखावे वारकरी आणि भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाथ षष्ठी यात्रा रद्द केल्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या कमी होती.