औरंगाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून शुक्रवारी रुग्णसंख्येने मागील सहा महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात 459 नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्यास लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे सोमवारपासून लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संकेत मनपा आयुक्तांनी दिले आहेत.
शहरातील गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव मोठ्या संख्येने होत आहे. त्यात जाधववाडी येथील भाजी मंडई आणि गुलमंडी परिसरात गर्दी होण्याचे प्रमाण अधिक आहे. मागील वर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जाधव मंडी बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. तसाच काहीसा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनशिवाय कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येणे शक्य नाही. त्यामुळे किमान दहा दिवसांचा बंद पाळण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी दिवसभरात झाला उद्रेक
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांपासून रोज साडेतीनशेहून अधिक रुग्ण वाढत आहेत, त्यात शुक्रवारी रुग्ण संख्येने
459 उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 हजार 103 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1 हजार 284 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2 हजार 910 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तर 179 जणांना (मनपा 152, ग्रामीण 27) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 47 हजार 909 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत मुकुंदवाडीतील 65 वर्षीय पुरुष, खुलताबाद तालुक्यातील नांदराबाद येथील 66 वर्षीय पुरुष, नंदनवन कॉलनीतील 79 वर्षीय पुरुष, फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार 58 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात 73 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.