औरंगाबाद - मार्च ते ऑक्टोबरपर्यंत सर्व व्यवहार बंद होते. त्यात वीजबिल वाढून आले होते त्यावर सरकारने यावर काही तोडगा काढावा अशी विनंती आम्ही केली होती. मात्र, काही निर्णय झाला नाही, आता एक महिन्याचा अवधी देत आहोत. वीजबिलात पन्नास टक्के सूट द्या, अन्यथा महाराष्ट्रातील कोणतेही नागरिकांनी वीज बिल भरू नये, असे आवाहन आम्ही करू, असा इशारा एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
बिहार निवडणुकीबाबत येत्या चार-पाच दिवसांत एमआयएम पक्षाकडून लवकरच मोठी घोषणा होणार असून त्यात कुणासोबत युती होणार आहे याची माहिती दिली जाईल. कोणासोबत जायचे आहे याबाबत पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी अंतिम निर्णय घेतील. सोबतच बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून आम्ही सुद्धा जाणार असल्याचे जलील म्हणाले.धार्मिक स्थळ सुरू करण्याबाबत आम्ही आंदोलन केले. त्यावेळी लवकर निर्णय घेऊ, असे शिवसेनेने सांगितले होते. मात्र त्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही तर दुसरीकडे बार उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे कोरोना फक्त धार्मिक स्थळांमध्येच पसरतो का, असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. टाळेबंदीच्या काळात अनेकांना रोजगार नव्हता त्यामुळे आजही त्यांच्या मोठ्या अडचणी आहेत. अशा परिस्थितीत वीजबिल माफ करावे, अशी आमची मागणी होती. त्याबाबत अनेकवेळा निवेदन देऊनही त्याबाबत विचार झाला नाही. किमान पन्नास टक्के तरी वीजबिल माफ करा, अशी मागणी एमआयएमची असून सरकारला एक महिन्याच्या अवधी देत आहोत. याकाळात निर्णय न झल्यास आम्ही आमचा हिसका दाखवू आणि नागरिकांना बिल भरण्यापासून रोखू, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
हेही वाचा - औरंगाबाद जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बिहार निवडणूक निरीक्षकपदी नियुक्तीला विरोध