औरंगाबाद - खेळताना नदीच्या पाण्यात बुडालेल्या मुलाला वाचवताना मुलासह आईचा बुडून मृत्यू झाला आहे. वैजापूरमधील धोंदलगाव येथे गुरुवारी दुपारी बारा वाजता ही दुर्देवी घटना घडली.
सोनाली राजू आघाम वय (२२) अन्वेश आघाम वय (३) रा. गुरू धानोरा. ता. गंगापूर अशी मृत मायलेकांची नावे आहेत. सोनाली ही भाऊबीजेसाठी धोंदलगाव येथे माहेरी भाऊ कृष्णा सुखदेव करवंदे यांच्याकडे प्रथमेश आणि अन्वेश या दोन्ही मुलांना घेऊन आली होती.
हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या
करवंदे कुंटुबीय हे धोंदलगाव शिवारात शेतात नदीकाठी राहतात. समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ठेकेदाराने नदीपात्रात खोदकाम सुरु केले आहे. मुरूम काढल्याने नदी पात्र खोल झाले असून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दुपारी बाराच्या सुमारास सोनाली ही कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. तिची नजर चुकवून अन्वेश हा खेळत खेळत तिच्यामागे आला. मात्र, खेळताना पाय घसरून तो पाण्यात पडला. ही बाब सोनालीच्या लक्षात येताच तिने मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र पाणी जास्त असल्याने आणि पोहताही येत नसल्याने मायलेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, नातेवाईकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी चार वाजता दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास ग्रामस्थांना यश आले. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.