औरंगाबाद - अनेक वर्ष मेहनत करून खेळात प्राविण्य मिळवल्यावर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मात्र जर नोकरी नसेल तर हा सन्मान नको, अशी भूमिका घेत राज्यातील 100 हून अधिक खेळाडूंनी आपला पुरस्कार सरकारला परत देण्याचा निर्णय घेतला आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत जर नोकरी बाबत योग्य निर्णय झाला नाही तर आम्ही पुरस्कार परत करू, अशी भूमिका खेळाडूंनी घेतली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरी द्या
अनेक वर्षे खेळात सातत्य ठेवत विजयी कामगिरी केल्यावर हा पुरस्कार दिला जातो. सन्मानाचा असलेला पुरस्कार मिळाल्यावर नोकरीत सामावून घेऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र नोकरी न मिळाल्याने पुरस्कार परत देण्याची भूमिका घेतली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेकडे नोकरी बाबत तीन खेळाडूंनी पाठपुरावा केला. मात्र पालिकेकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने पहिल्या टप्प्यात औरंगाबादसह राज्यातील 50 हून अधिक खेळाडू पुरस्कार परत करणार असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे यांनी दिली.
स्नेहा ढेपे या खेळाडूला नोकरीची गरज
स्नेहा ढेपे या महिला खेळाडूने तलवारबाजीत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना 2014 मध्ये छत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र पुरस्काराने पोट भरत नाही हाताला काम हवे, अशी भावना स्नेहा ढेपे यांनी व्यक्त केली. स्नेहा ढेपे त्यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर दोन मुलांसह उदरनिर्वाह करणे त्यांना अवघड झाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने कुटुंबाला सावरणे जिकरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत किमान नोकरी तरी द्या, अशी मागणी स्नेहा ढेपे यांनी केली आहे.
सांगली महानगरपालिकेने दिली नोकरी
राज्यात अनेक छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. त्यापैकी प्रत्येकालाच रोजगार मिळेल असे नाही. त्यामुळे रोजगार मिळत नसलेल्या पुरस्कार विजेता खेळाडूंना सरकारी नोकरीत समावून घ्यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. राज्यात सांगली महानगरपालिकेने चार खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीत सामावून घेतले आहे. याच निर्णयाचा आधार घेत राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खेळाडूंसाठी नोकरी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
19 फेब्रुवारीपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर, खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांना छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. महाराजांचे नाव या पुरस्काराला असल्याने पुरस्काराचे एक वेगळेच महत्त्व असल्याचे मत खेळाडूंनी मांडले. छत्रपतींच्या नावाचा पुरस्कार विजेत्या खेळाडूंना रोजगार नाही. पुरस्काराचा सन्मान म्हणून तरी खेळाडूंसाठी रोजगार दिला पाहिजे. मात्र सरकार नुसते आश्वासनच देत असल्याने हा महाराजांच्या नावाचा अवमान केला जात असल्याचा आरोप खेळाडूंनी केला.
युती सरकारच्या काळात सरकारच्या काही मंत्र्यांनी खेळाडूंना नोकरी मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले. मात्र हा विकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळाडूंचा सन्मान केला जाईल. खेळाडूंना नोकरी दिली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही अद्याप नोकरी मिळाली नाही. त्यामुळेच महाराजांचा सन्मान म्हणून त्याच्या जयंतीपर्यंत म्हणजेच 19 फेब्रुवारीपर्यंत सरकारने नोकरी देण्याची वाट आम्ही पाहू, त्यानंतर मात्र पुरस्कार परत करू, असा इशारा खेळाडूंनी दिला आहे.
राज्यात 103 पुरस्कार प्राप्त खेळाडू नोकरीच्या प्रतीक्षेत
राज्यातील अनेक छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी स्वतःचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. तर काही खेळाडू नोकरी करत आहेत. मात्र काही खेळाडूंना अद्यापही रोजगार मिळाला नाही. कबड्डी, जिम्नॅस्टिक, कुस्ती, तलवारबाजी, जुडो अशा खेळांमध्ये छत्रपती पुरस्कार मिळवणारे जवळपास 103 खेळाडू आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पुरस्कार मिळाल्यावर सरकारी नोकरी मिळेल असा आश्वासन देण्यात येतात. इतक्या वर्षात पुरस्कार प्राप्त खेळाडूंना नोकरी मात्र मिळाली नाही. अनेक वेळा पाठपुरावा करूनही आश्वासन मिळत आहेत. त्यामुळे 103 खेळाडूंपैकी पन्नास खेळाडू पहिल्या टप्प्यात आपला पुरस्कार परत करणार आहेत, अशी माहिती तलवार बाजी मध्ये पुरस्कार प्राप्त सागर मगरे यांनी दिली.