औरंगाबाद - कोरोनाच्या संकटात वीजवितरण कंपनीने नागरिकांना जास्तीचे वीजबिल देत शॉक दिला. वाढीव बिल रद्द करा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यावर वीजबिल कमी करू असे संकेत राज्यातील मंत्र्यांनी दिले होते. मात्र नंतर त्याच मंत्र्यांनी वीजबिल भरावे लागेल असे सांगितले. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत वीजवितरण विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानुसार राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मनसेने आक्रमक होत पोलिसांचा विरोध झुगारून सरकारविरोधी घोषणाबाजी केली.
महावितरणने लोकांना पैसे मागू नये, मनसेचा इशारा...
महावितरण थकीत वीजबिलासाठी राज्यात वसुली अभियान राबवणार आहे. मात्र त्याआधी नागरिकांची आलेली वाढीव बिलं कमी करा, त्यानंतर अभियान राबवा, मात्र त्यापूर्वी जर वीजबिल वसुली करताना जबरदस्ती केली, वीज खंडित करण्याचा प्रयत्न केला तर मनसे धडा शिकवेल, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
आंदोलनाच्या वेळी मनसेत गटबाजी
वाढीव वीज बिलाविरोधात औरंगाबादेत पोलिसांच्या परवानगीशिवाय मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलन करत असताना जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे आणि राज्यउपाध्यक्ष सुमित खांबेकर यांचे दोन गट पडल्याचे आंदोलनस्थळी दिसून आले. सुहास दशरथे गट घोषणाबाजी करत असताना खांबेकर गट शांत होता, तर खांबेकर गट घोषणाबाजी करत असताना दाशरथे गट शांत उभा होता. दोनही गट आजूबाजूला वेगवेगळे उभे राहिले होते. सुमित खांबेकर यांच्यासोबत प्रकाश महाजन देखील उभे होते. आंदोलनात वेगळ्या गटबाजीच्या बातम्या येतील ही बाब सुमित खांबेकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सुहास दशरथे यांच्यासोबत जाऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मनसेतील स्थानिक गटबाजी सर्वांच्या लक्षात आली. या गटबाजीमुळे पक्षाला नुकसान हेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - औरंगाबाद : परवानगी नाकारल्यानंतरही मनसैनिकांची वीजबिलाविरोधात आंदोलनाची भूमिका
हेही वाचा - व्यावसायिकांनो कोरोनाचे नियम पाळा; अन्यथा कारवाईला सामोरे जा, पालिका आयुक्तांचा इशारा