औरंगाबाद - माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांनतर भाजप कार्यकर्त्यांनी सत्तार यांचा निषेध व्यक्त करत विधानसभेला अब्दुल सत्तार यांचा पराभव करण्याचा निर्धार केला. या पार्श्वभूमीवर सत्तार यांनीही शक्तीप्रदर्शन करत भाजप कार्यकर्त्यांना उत्तर दिले.
माजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या निमित्ताने सिल्लोड मतदार संघात प्रथमच शिवसेनेचा जयघोष झाला. भाजप लढवत असलेल्या या मतदार संघात प्रथमच शिवसेनेचे ध्वज फडकले. भाजपच्या मतदार संघात सेनेने शक्तीप्रदर्शन करत आगामी काळात सत्तारच विधानसभा लढवतील हे स्पष्ट केले. अब्दुल सत्तार काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर ते भाजप प्रवेश करतील अशी शक्यता होती. मात्र, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केल्याने अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करत सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर भाजपचा मतदार संघ शिवसेनेला सोडू नका अन्यथा बंडखोरी करू असा पवित्रा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतला.
हेही वाचा - 'सिल्लोडची जागा सेनेला सोडू नका, अन्यथा बंडखोरी करणार'
या सर्व घडामोडीत अब्दुल सत्तार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करून भाजपच्या स्थानिक नेत्यांना आपली ताकद दाखवून दिली. अब्दुल सत्तार यांच्या स्वागतासाठी सिल्लोड येथे बनकीन्होळा येथून मतदारसंघात भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅलीची भव्यता, जय भवानी जय शिवाजीचा जयघोष व शिवसैनिकांच्या प्रचंड सहभागामुळे निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच अब्दुल सत्तार यांचे भव्य असे शक्ती प्रदर्शन सिल्लोड तालुक्यात पाहायला मिळाले. अब्दुल सत्तार यांचे बाभूळगाव येथे आगमन झाले. येथूनच या रॅलीला सुरुवात झाली. पुढे केऱ्हाळा, पळशी, अंधारी, बोरगाव बाजार, देऊळगाव बाजार, घाटनांद्रा, आमठाणा, भराडी, वडोद, अंभई, उंडणगाव, अजिंठा शिवना या गावात रॅली मार्गक्रमण झाली. रॅली दरम्यान गावागावात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. आता अब्दुल सत्तार यांच्या शक्ती प्रदर्शनाला भाजप कश्या पद्धतीने उत्तर देणार हेच पाहण्यासारखं असेल.
हेही वाचा - सत्तारांचा शिवसेनाप्रवेश भाजपच्या जिव्हारी.. नगराध्यक्षावर आणला अविश्वास