मुंबई/नागपूर/औरंगाबाद - सैन्य भरतीबाबत केंद्राने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेनंतर देशभरात विरोध केला जात आहे. त्यात आता लष्करी अधिकाऱ्यांनीही योजनेचे धोके अधोरेखित केले आहेत. चार वर्षांची सेवा संपल्यावर या जवानांना योग्य दिशा मिळाली नाही तर अतिरेकी किंवा नक्षली कारवाया करणाऱ्यांच्या जाळ्यात ते अडकले तर ते अधिक धोकादायक असल्याचे मत अंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने चार वर्षांसाठी सैन्यात नोकरी देण्याची नवीन योजना आणली आहे. या योजनेद्वारे युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना एका विशिष्ट रकमेवर चार वर्षे नोकरी दिली जाणार आहे. मात्र, चार वर्षानंतर या युवकांच्या भवितव्याचा सरकारने विचार केलेला नाही. सरकार या युवकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला आहे. तसेच चार वर्षांनंतर नोकरी मिळाली नाही तर तेच युवक दरोडेखोर बनतील, अशी भीतीही ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केली.
काय आहे "अग्निपथ" योजना - लष्करात शिपाई पदावर भरती होण्यासाठी केंद्र सरकारने "अग्निपथ" नावाची संकल्पना समोर आणली आहे. ही भरती फक्त जवान पदासाठी असून यातून अधिकारी भरती होणार नाही. तर महिलांनाही शिपाई पदावर भरती होता येणार आहे. या योजनेत भरती झालेला जवान अवघी चार वर्षे देशासाठी लष्कर सेवा करू शकणार आहे. प्रत्येक वेळी भरती झालेल्या जवानांपैकी 25 टक्के इतक्याच युवकांना पुढे लष्करात सेवा सुरू ठेवता येणार आहे. सेवा नियमित करण्यास निवड न होणाऱ्यांना आपल्या घरी परतावे लागणार आहे. चार वर्षांची सेवा झाल्यावर अकरा लाखांचा सेवा निधी देण्यात येईल. या रकमेतून ते स्वतःचा रोजगार उभा करू शकतात. त्याबरोबर सैन्यात मिळालेल्या प्रशिक्षणानंतर त्यांना कौशल्य प्रमाणपत्र देण्यात येईल. त्या आधारावर राज्य सरकारच्या किंवा इतर सेवेत त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. चार वर्षांच्या सेवेत जवान देशासाठी अमर झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 48 लाखांची मदत दिली जाणार आहे, अशी योजना केंद्र सरकार तर्फे जाहीर करण्यात आली आहे.
सेवा झाल्यावर योग्य दिशा गरजेची - चार वर्षांची सेवा समाप्त झाल्यानंतर जवान आपल्या घरी आल्यावर त्यांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. नाही तर देश विघातक कारावयांमध्ये त्यांचा वापर होण्याचा धोका नाकारता येत नाही. दहशतवादी कारवाया करताना आपल्याच देशाचे सैन्य प्रशिक्षण घेतलेल्या जवानांचा उपयोग करून घेणे, जातीच्या नावावर सेवा संपलेल्या जवानांचा वापर करत समाजिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे सेवा समाप्त करून आलेल्या या युवकांना योग्य दिशेने ठेवण्याचे आव्हान देशासमोर असणार असल्याचे मत औरंगाबाद येथील डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले.
योजनेत अनेक त्रुटी - आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये भरती झाल्यावर खडतर प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी 18 ते 22 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर देशासाठी सेवा देणारा जवान तयार होतो. जो कुठल्याही परिस्थितीत देशाची सेवा करण्यास सज्ज होतो. मात्र, अग्निपथ योजनेत अवघ्या सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल त्यानंतर लगेच त्यांची सेवा सुरू होईल. मात्र, अवघ्या सहा महिन्यात खडतर प्रशिक्षण पूर्ण होईल का?, देशाच्या संरक्षणासाठी असलेले हत्यार आणि इतर शस्त्रांची माहिती आणि सवय कशी होईल. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणात हे जवान सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करू शकतील का?, हा देखील प्रश्न असल्याचे मत अंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले.
चार वर्षांतच सैन्याबाहेर पाठवून सरकार काय साध्य करणार..? - केंद्र सरकारने चार वर्षांसाठी सैन्यात नोकरी देण्याची नवीन योजना आनली आहे. या योजनेद्वारे युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना एका विशिष्ट रकमेवर चार वर्षे नोकरी दिली जाणार आहे. मात्र चार वर्षानंतर या युवकांच्या भवितव्याचा सरकारने विचार केलेला नाही. सरकार या युवकांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप सध्या मुंबईत राहणारे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला आहे. सैन्य दलाचे प्रशिक्षण घेतलेले युवक चार वर्षानंतर जर त्यांच्या हाताला काम मिळाले नाही, तर दरोडेखोर होतील. याआधीच पंधरा वर्षे सैन्यात काम केलेल्या तरुणांना नोकर्या मिळत नाही त्यांना दारोदार हिंडावे लागत आहे अशा वेळी चार वर्षात सैन्याबाहेर पाठवून सरकार काय साध्य करणार आहे, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.
पथदर्शी योजना - दरम्यान, काही जणांकडून या योजनेचे समर्थनही करण्यात आले आहे. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले, सैन्यात चार वर्षे अग्नीवीर म्हणून काम केल्यानंतर मोठी रक्कम उमेदवाराच्या हाती पडणार आहे. शिवाय 25 टक्के तरुणांना सैन्यात काम करण्याची संधीही उपलब्ध होणार असल्याने देशाच्या संरक्षण क्षेत्राला मजबुती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एखादा तरुण 18 व्या वर्षी अग्निवीर झाल्यास 22 वर्षी त्याच्या हाती सुमारे 20 ते 22 लाखांची मोठी रक्कम हाती पडेल. त्यातून तो स्वतःचा व्यवसायही उभा करू शकतो. ही योजना पथदर्शी असून तरुणांचे माथे भडकावण्याचे काम काही तत्वांकडून केले जात असल्याचा, आरोपही सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेले निवृत्त कर्नल पटवर्धन यांनी केला आहे.
हेही वाचा - Video : बिहारमध्ये 'अग्निपथ'वरून अग्नितांडव.. ठिकठिकाणी जाळपोळ.. पहा संपूर्ण आढावा