औरंगाबाद - लोकशाही म्हणजे 105 आमदार असणारा पक्ष विरोधी नेता होतो, ते आता कळले आणि याचे दर्शन पवार साहेबांनी घडवले, असा टोला राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी औरंगाबादेत लगावला. मराठवाड्यातील शैक्षणिक प्रकल्प विदर्भात नेणारे फडणवीस मराठवाडा पदवीधर मतदारांना मते मागतात कसे? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.
लोकशाहीचा अर्थ मला आत्ता समजला, ज्या वेळी 64 आमदार असणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री, 54 आमदार असणाऱ्या पक्षाचा उपमुख्यमंत्री आणि 44 आमदार असणाऱ्या पक्षाचे आमदार मंत्री होतात आणि 105 आमदार असणाऱ्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी अर्थ समजला आणि ते दाखवणारे शरद पवार आहेत. होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते जर कोणी करू शकत असेल तर पवारसाहेब आहेत. भाजपत इनकमिंग सुरू असताना त्यांना समजावले होते. मात्र, पवार साहेब संपले असे ते सांगत होते. आता त्यांना कळले, अशी टोलेबाजी धनंजय मुंडे यांनी प्रचार मेळाव्यात केली.
भाजपने मराठवाडा पदवीधर मतदारसंघ डोक्यातून काढून टाकावा
माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर आले होते. त्यांनी यांच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन केले. मात्र, तो अधिकार त्यांना आहे का? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना विधी विद्यापीठ नागपूरला नेले आणि आता तुम्ही मत मागण्यासाठी कसे आलात, असे अनेक उद्योग त्यांनी केले. अनेक शैक्षणिक संस्था मराठवाडा - औरंगाबादला येत होत्या यांनी नागपूरला नेल्या आणि हे मराठवाड्यातील पदवीधर विसरणार नाहीत, असा धडा शिकवू की, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ भाजपने कायमचा डोक्यातून काढून टाकला पाहिजे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांच्यावर केली.
मोदी आणि महाजनांवर टीका
भाजपचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या जाहीरनाम्याच्या कागदावर मोदींचा फोटो कसा? असा प्रश्न पडला होता. मात्र, नंतर लक्षात आले की, पंतप्रधान होण्यासाठी पदवीधर असण्याची आवश्यकता नसते, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावरून धनंजय मुंडे यांनी टीका केली. तर भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना पिस्तुलराव महाजन, अशी उपमा देत टीका केली. पिस्तुल्या म्हणले तर त्यांना राग येतो. म्हणून पिस्तुलराव नाव ठेवले, अशी मिश्किल टीका त्यांनी केली.
आमची ताकद वाढली..
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आम्ही आता मजबूत झालो आहोत. बारा वर्षांपूर्वी भाजपच्या ताब्यात असलेली जागा आम्ही मिळवली. पहिल्या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीचे मते घेत चुरशीच्या लढतीत आम्ही जिंकलो. दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेससोबत होती, आम्ही चांगल्या मतांनी जिंकलो. आता शिवसेनासोबत असल्याने ताकद वाढली, विजय आपलाच आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.