औरंगाबाद - भारतात बहुतांशी व मक्याच्या पिकांवर लष्करी अळीची विध्वंसक कीड लागली आहे. या कीडमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली गेली. यासंबंधी कृषी विभागाने औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या अमेरिकन लष्करी अळीने पूर्ण आशिया खंडात हाहाकार माजला आहे. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवर यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला.
या अळीने आफ्रिका खंडात, भारत, चीन, फिलिपाइन्स या देशांमध्ये मक्याच्या पिकावर मोठा प्रकोप केला आहे. या कीडमुळे मक्याच्या पिकाचे 20 ते 60 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याची नोंद होत आहे. या किडीला त्वरित उपाय करुन थांबवण्याची गरज आहे. अथवा मक्यासह इतर पिकांवर देखील ही कीड लागून मोठे नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
80 प्रकारच्या वनस्पतीवर जगू शकणाऱ्या या अळीचे मका हे आवडते पीक आहे. औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा मिळून जवळपास तीन लाख हेक्टरवर मका पीक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुका अंतर्गत लोणी बुद्रुक, संवदगाव, औरंगाबाद तालुक्यातील चौका, खुलताबाद तालुक्यातील गदाना, सालूखेडा, कन्नड तालुक्यातील रिट्टी आदी गावातील मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ही अळी दोन ते तीन दिवसात पहिली, चार ते पाच दिवसात दुसरी, आणि 18 ते 19 दिवसात तिसरी अवस्था पार करते.
म्हणून यावर नियंत्रण मिळवणे थोडे अवघड आहे. परंतु एकात्मक व्यवस्थापनातून या अळीवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे मत कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जवळपास 35 ते 40 टक्के बीज प्रक्रिया केलेल्या बी-बियाणांचा वापर शेतकरी पेरणीसाठी करत आहेत. त्यामुळे 60 टक्के क्षेत्रावर लवकरच अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हा धोका टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी पुढीलप्रमाणे सूचना केल्या आहेत.
1) बीज प्रक्रिया केलेले बियाणे वापरावे.
2) घरच्या घरी घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करून त्याचा वापर करावा.
3) सामूहिक रीत्या कामगंध सापळे लावून नर पतंग पकडून मारा.
4) प्रकाश सापळे लावा
5) एकाच वेळी पेरणी करा उशिरा लागवड करू नका.
6) बहुविध पीक पद्धती किंवा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा.
7) स्थानिक पद्धतीचा वापर करा.
8) उपायोजना सोबतच दर दोन दिवसांनी पिकांचे निरीक्षण करा.