औरंगाबाद - शहरातील भीषण कचराप्रश्न अद्याप मिटायला तयार नाही, याचे परिणाम औरंगाबादकरांना भोगावे लागत आहेत. नुकतीच शहरात कचऱ्यामुळे लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. कंचनवाडी भागात राहणाऱ्या गणेश पागोरे या तरुणाला पाहण्यासाठी नातेवाईक आले होते. मुलगा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला, चहा-पोहे घेत मुलीच्या घरच्यांनी पसंती दर्शवली. लग्न ठरणार तितक्यात कचऱ्याचा दुर्गंध पसरला. पागोरे कुटुंबीयांनी घरात अगरबत्ती लावली. पाहुणे मंडळींनी कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे तिथून जाणे पसंत केले. इतकेच नाही तर आता लग्न शक्य नाही, लग्न जुळवायचे असल्यास मुलाला दुसरीकडे राहायला पाठवा असा अजब सल्ला पाहुण्यांनी दिला.
समीर (नाव बदललेआहे) पागोरे हा तरुण पदवीधर आहे. त्याची घरची परिस्थिती बेताची आहे. तोनुकताच एका खासगी कंपनीत कामावर रुजू झाला. नातेवाईकांनी लग्नासाठी वेगळ्या ठिकाणी राहण्याची अट घातल्याने गणेश देखील निराश झाला आहे. कचऱ्यामुळे जर नातेवाईक लग्नाला मुलगी द्यायला तयार नसतील तर कस होणार? असा प्रश्न समीरलापडला आहे. औरंगाबादेत गेल्या वर्षभरापासून कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. त्यात महानगरपालिकेने कंचनवाडीमध्ये कचरा साठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरात कचऱ्याचा दुर्गंध पसरलाय. या दुर्गंधीमुळे परिसरात रोगराई, विविध आजार वाढले आहेत. इतकच नाही तर नातेवाईक देखील घरी यायला नकार देत आहेत.
शहराचा कचरप्रश्न न्यायालयात गेला होता, न्यायालयात पालिकेने कचरप्रश्न सोडवण्याचे आश्वासन न्यायालयासह शहरातील नागरिकांना दिले होते. मात्र, आश्वासनाला वर्ष उलटले असले तरी कचराप्रश्नी तसाच राहिला आहे. त्यामुळे नागरिकांना या कचऱ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.