औरंगाबाद - ऐतिहासिक वारसा जपणारे शहर अशी ओळख असलेल्या या शहराला ऑटो हब अशी नवी ओळख मिळू पाहत आहे. ऑटो इंडस्ट्रीजमध्ये मोलाचे योगदान देणारी औद्योगिक वसाहत म्हणून औरंगाबाद शहराचे नाव घेतले जाते. मात्र, या अशा वसाहतीत आजही सोयी-सुविधांचा अभाव असल्याने अनेक नवे प्रकल्प औरंगाबादऐवजी दुसऱ्या उद्योगिक वसाहतीकडे वळत आहेत.
एखाद्या शहराला औद्योगिक महत्त्व प्राप्त होण्यासाठी नामांकित कंपन्यांचे प्रकल्प त्याठिकाणी असणे गरजेचे असते. औरंगाबाद औद्योगिक वसाहत निर्माण होण्यामागे बजाज या नामांकित कंपनीचे मोठे योगदान आहे. ऐंशीच्या दशकात औद्योगिक वसाहत सुरू झाली, त्यावेळी बजाजचा प्रकल्प सुरू झाला. त्यानंतर औद्योगिक वसाहतीला वेगळेचं महत्त्व प्राप्त व्हायला सुरुवात झाली. औद्योगिक वसाहत झपाट्याने वाढत गेली आणि 90 च्या दशकात औरंगाबाद शहर आशिया खंडात झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ओळख निर्माण झाली. बजाज कंपनी नुसती आली नाही तर अनेकांना रोजगार देणारी ही कंपनी ठरली. इतकच नाही तर या कंपनीला लागणारे साहित्य निर्मिती करणाऱ्या काही लहान कंपन्यादेखील पाय रोवून उभ्या राहिल्या आणि त्यामुळे हजारोंना रोजगार मिळाला.
बजाजनंतर आल्या अनेक नामांकित कंपन्या -
बजाज कंपनी मराठवाड्यात दाखल झाल्यानंतर औरंगाबाद उद्योगिक वसाहतीत स्कोडा, ग्रीव्हज, परकिन, एनआरबी, इंडुरन्स अशा अनेक कंपन्या दाखल झाल्या. त्यामधून अनेकांना रोजगार मिळाला. या कंपन्यांना संलग्न अश्या छोट्या मोठ्या कंपन्या येथे उभ्या राहिल्या. आज जवळपास साडेतीन ते चार हजार प्रकल्प या औद्योगिक वसाहतीत उभे राहिले आहेत. ऑटोमोबाइल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे मात्र, तरीही इंडस्ट्री वाढण्यासाठी आणखी चालना मिळण्याची गरज आहे. सरकारने या औद्योगिक वसाहतीकडे पाहून अनेक नवीन प्रकल्पांना सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितच एक मोठी आणि चांगली औद्योगिक वसाहत पुन्हा कात टाकून जोमाने उभी राहील, असे मत मसीआ(मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर)चे अध्यक्ष अभय हंसनाळ यांनी व्यक्त केले.
सुविधा नसल्याने अनेक नवे प्रकल्प गेली राज्याबाहेर -
पुणे, मुंबई, अशा औद्योगिक वसाहतीच्या मानाने मराठवाड्यातील औरंगाबादच्या सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुविधांची कमतरता नेहमीच जाणवते. याचा परिणाम नवीन ऑटो उद्योगांवर होत असतो. सोयी-सुविधा नसल्याने मोठे गुंतवणुकदार गुंतवणूक करायला तयार होत नाहीत. त्यामुळेच किया मोटर्स, हिरोहोंडा सारख्या नामांकित कंपन्या राज्याच्या बाहेर गेल्या आहेत. उद्योगांना सर्व सुविधा असणे गरजेचे आहे. मुळात औद्योगिक वसाहत सर्वात मोठी झाली असली तरी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळेच प्रकल्प येत नाहीत. सरकारने पायाभूत सुविधांकडे लक्ष दिल्यास अनेक मोठे आणि नवे प्रकल्प मराठवाड्यात दाखल होऊ शकतात. त्यामुळे या भागात मागासलेपण दूर होऊ शकते, असे मत मसीआचे उपाध्यक्ष किरण जगताप यांनी व्यक्त केले.
कनेक्टिव्हीटी नसल्याने होती मोठी अडचण -
औरंगाबादपासून पुणे, मुंबईसह परराज्यात जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था योग्य रीतीने नाही. त्याचा मोठा फटका उद्योगांना बसतो. उद्योजकांना पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. कनेक्टिव्हिटी असली तर नवे उद्योग येतील. मात्र, औरंगाबादला योग्य प्रमाणात कनेक्टिव्हिटी नसल्याने अडचण येते. पुणे मुंबई रेल्वे मार्ग, राज्यात आणि राज्याबाहेर जाण्यासाठी विमानसेवा या बाबी महत्वाच्या असल्याने या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत मसीआ सचिव भगवान राऊत यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर ऑटो इंडस्त्रीसाठी कौशल्यविकास कार्यक्रमा अंतर्गत युवकांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.