औरंगाबाद - मराठा आरक्षण याचिका सुनावणी लांबल्याने राज्यात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. संतप्त झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध केला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर आज पैठण महामार्गावर सरकार विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली. रस्त्याच्या मधोमध टायर जाळून मराठा आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. न्यायालयात योग्य बाजू न मांडणाऱ्या अशोक चव्हाण यांनी तातडीने उपसमिती वरून हकालपट्टी करा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
..अन्यथा पुन्हा आंदोलनाला सुरुवात
सर्वोच्च न्यायालयात याचिका असताना सरकारी वकील गैरहजर राहिले. सरकारला मराठा आरक्षण याचिका महत्त्वाची वाटत नाही का? असा संतप्त प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. आजच्या सुनावणीत स्थगिती उठली नाही तर आंदोलनाला सुरुवात होईल असा इशारा शनिवारी झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत देण्यात आला होता.
अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा
सर्वोच्च न्यायालयात पुन्हा बाजू मांडण्यास सरकार अपयशी राहिले. त्यामुळे पुन्हा राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाची ठिणगी पडली आहे. मराठा आरक्षणासाठी पैठण औरंगाबाद रस्त्यावर टायर जाळून महाविकास आघाडी सरकार व मराठा आरक्षण उपसमीतीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा जाहीर निषेध करण्यात आला. अशोक चव्हाण यांची आरक्षण समिती अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी ठोकमोर्चा समन्वयक रमेश केरे आणि रवींद्र काळे यांनी केली.
बिडकीन येथे झालेल्या आंदोलनात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील, रविंद्र काळे पाटील, किरण काळे पाटील, मनोज मुरदारे, कृष्णा उघडे, अप्पासाहेब जाधव, विजय हाडे यांनी सहभाग घेतला. उद्या पासून राज्यभर पडसाद पहिला मिळतील असा इशारा आंदोलकांनी दिला.