छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange on Chhagan Bhujbal : दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या जुनाट नेत्याला सरकारनं आवर घालावा, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते तथा राज्य सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलीय. ते अनुभवी आहेत असं म्हणतात, मग अशी वक्तव्ये का करतात, मराठा समाज शांततेत आपल्या मागण्यासाठी आंदोलन करतोय. यावेळी राज्यातील सर्व लोकांनी मराठा समाजाला साथ द्यावी, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे, अशी विनंती देखील त्यांनी केलीय. तसंच छगन भुजबळांनी भीमा कोरेगाव बद्दल जातिवाचक शब्द काढले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असंही मनोज जरांगे म्हणालेत.
आरक्षण मागणे म्हणजे जातीवाद नाही : पुढं बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, छगन भुजबळ दलित मुस्लिम यांच्यासह सगळ्या इतर समाजांना सोबत येण्याचं आवाहन करत आहेत. आमचा सुपडा साफ करू असं ते म्हणतात, पण त्यांनी असं स्वप्न पाहू नये. आम्ही दलित, मुस्लिम किंवा कोणत्याही समाजाच्या विरोधात कधीच नाही. आम्ही फक्त ओबीसी मधून आरक्षण मागतोय. आमचे कुणबी जातीचे दाखले मिळत आहेत आणि त्यानुसारच आरक्षण मागत आहोत. आधी भुजबळ दलित, मुस्लिम समाजाचा विरोधात काय बोलत होते हे सर्वांना माहीत आहे. मात्र, आज गरज पडली म्हणून ते त्यांना सोबत घेण्याच्या गोष्टी करत आहेत. आम्ही आरक्षण मागितलं म्हणजे जातिवाद करतो असं होत नाही. धनगर समाजाच्या लोकांना आरक्षणाची गरज वाटली म्हणून ते मागतात, तसं आम्हाला देखील आरक्षणाची गरज वाटते म्हणून आम्ही ते मागत आहोत, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय.
तुम्हाला ताकदवर नेते सोडून गेले : मंत्री भुजबळांवर टीका करताना जरांगे म्हणाले की, आम्ही शांततेत बसलोय. मात्र, हा जुनाट नेता काहीही बोलतोय. त्यांना काही काम राहिलं नाही. मी जातिवाद करत नाही. त्यामुळं तसा रंग देऊ नका. यांना थांबवा अन्यथा आम्हीही बोलू शकतो, यांना थांबवण्याची जबाबदारी सरकारची असून त्यांना थांबवावं अशी विनंती जरांगेंनी सरकारला केली आहे. मराठा आरक्षणावर बोलले तर सोडणार नाही. इतके अनुभवी आहात तर शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी. तुम्ही इतके अनुभवी असूनही सगळे तुम्हाला सोडून गेलेत. त्यामुळे आता शहाणं व्हावं, या वयात जाती जातीत दंगली घडवण्याचा प्रयत्न यांनी करु नये आणि सरकारही यांच्या दबावात का येतं? हे देखील कळत नाही. काही मातब्बर ओबीसी नेते ज्यांना समाजात मोठी मान्यता आहे, ते देखील यांना सोडून गेले आहेत. त्यांच्याबरोबर ते बोलायला किंवा सोबत बसायला तयार नाही. त्यामुळं आपण चुकीच्या मार्गावर जातोय का, हे देखील त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, अशी टीका जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर केलीय.
राज्यात पुन्हा बारा दिवसांचा दौरा : मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना सर्व समाजाला शांततेचं आवाहन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा एकदा राज्यात दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय. 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर असा हा दौरा असणार आहे.
कसा असेल दौरा :
१ डिसेंबर - जालना
२ डिसेंबर - लाडसावंगी, कोलते पिंपळगाव, कन्नड.
३ डिसेंबर - चाळीसगाव, धुळे, जळगाव.
४ डिसेंबर - मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव आणि शेगाव.
५ डिसेंबर - चरणगाव, काट, हिंगोली
६ डिसेंबर - हिंगोली, पुसद, महागाव, माहूरगड
७ डिसेंबर - उमरखेड, वारंगा फाटा, नांदेड
८ डिसेंबर - नांदेड जिल्ह्यातील जिजाऊ नगर, मारतळा, कंधरा
९ डिसेंबर - लातूर जिल्ह्यातील जामगाव, उदगीर, निलंगा
१० डिसेंबर - औसा, लातूर, टेंभी, खिल्लारी, औंढा, उमरगा
११ डिसेंबर - लोहारा मुरुड आंबेजोगाई
१२ डिसेंबर - धारूर, बीड, माजलगाव, बोरी, सावरगाव
हेही वाचा :