औरंगाबाद - कुंडाच्या पाण्यात बसणे एका पर्यटकाच्या जीवावर बेतल्याची घटना अजिंठा लेणी परिसरात घडली आहे. अजिंठा लेणी पाहायला आलेले अशोक भाऊसाहेब हकांडे (रा. मुंबई) हे पर्यटक सुमारे ७० फूट खोल कुंडात पडले. दोन तासांच्या परिश्रमानंतर त्यांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना आणि पोलिसांना यश आले.
अशोक हकांडे, हे अजिंठा लेणी पाहण्यासाठी गुरूवारी दुपारी गेले होते. यावेळी ते सप्तकुंड धबधबा बघण्यासाठी सायंकाळी गेले होते. त्यावेळी ते धबधब्याच्या खूप जवळ गेले आणि त्या धबधब्याच्या पाण्याखाली जाऊन बसले. त्या ठिकाणी असलेल्या शेवाळामुळे त्यांचा पाय घसरून ते सुमारे ७० फूट खोल कुंडात पडले.
त्यानंतर मला वाचवा, मला वाचवा, अशी आरडओरड करायला सुरुवात केली. त्याच वेळी अजिंठा लेणीतून लेणापूरगावाकडे जाणाऱ्या काही नागरिकांनी त्याचा आवाज ऐकला. त्यानंतर पोलिसांना आणि भारतीय पुरातत्व विभागाला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी खाली दोर सोडून अशोक हकांडे यांना वर घेतले.