छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Maldives Tourist Issue: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच लक्षदीप दौऱ्यावर समुद्रकिनारी घेतलेले अनुभव समाज माध्यमांवर टाकले. तर रोमांचकता हवी असलेल्यांनी लक्षद्वीपला आपल्या यादीत ठेवावं असं देखील म्हटलं होतं. (Boycott Maldives) मोदी यांनी सांगितलेल्या अनुभवामुळे लक्षद्वीपकडे पर्यटकांना आकर्षित करण्यात आलं. त्याचा राग आल्यानं मालदीव मधील काही खासदारांनी त्याबाबत टीका केली आणि हीच टीका देशवासियांच्या जिव्हारी लागली आहे. पंतप्रधान यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे आता मालदीव टूर रद्द करण्याचा निर्णय टुरिझम व्यवसायिकांनी घेतला असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंग यांनी दिली.
मालदीवसाठी नियोजन नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालदीवच्या तीन खासदारांनी टीका केली. त्यामुळे येणाऱ्या काळात मालदीवसाठी पर्यटकांसाठी कुठलंही नियोजन केलं जाणार नसल्याची घोषणा पर्यटन व्यावसायिकांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या शहरांमधून वर्षाला पाच ते सात हजार पर्यटक मालदीवच्या दिशेनं जात असतात. तेथील निसर्गरम्य वातावरण पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. नुकतंच नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करताना अनेकांनी मालदीवलाच जाणं पसंत केलं होतं. भारतामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळत असते.
15 जणांनी केलं तिकीट रद्द : पंतप्रधानांवर झालेल्या टीकेच्या निषेधार्थ व्यावसायिकांनी मालदीवला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच दिवसात पडसाद पाहायला मिळाले असून पहिल्याच दिवशी जवळपास 15 जणांनी आपलं आरक्षित केलेलं तिकीट रद्द केलं आहे. आगामी काळात इतर नागरिक देखील अशीच भूमिका घेतील असं मत व्यक्त केलं जात आहे. तर देशात असलेल्या विशेषतः महाराष्ट्रात असलेल्या सुंदर पर्यटन स्थळांची माहिती लोकांना देऊ, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक आणि संभाजीनगर टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन अध्यक्ष जसवंत सिंग यांनी दिली.
समाज माध्यमांवर मालदीव विरोधात मोहीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेल्या टीकेच्या निषेधार्थ समाज माध्यमांवर "बायकॉट मालदीव" अशी मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारच्या दिवसभरात अनेकांनी या मोहिमेत सहभाग घेत, इतर पर्यटन स्थळांच्या बाबतीत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. मालदीव पेक्षा लक्षद्वीपला अधिक पसंती आगामी काळात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठवाड्याचा विचार केला तर या भागातून लक्षद्वीपला जाणं मालदीव पेक्षा अधिक स्वस्त आहे. मालदीवची सहल करण्यासाठी एकाला जवळपास ८० हजार रुपये मोजावे लागतात तर लक्षद्वीपला जाण्यासाठी ३० हजारात हे शक्य होतं. त्यामुळे मालदीवपेक्षा लक्षद्वीपला जास्त पसंती आगामी काळात मिळेल अशी शक्यता पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली.
हेही वाचा: