सिल्लोड (औरंगाबाद) - सोयगाव येथील पत्रकरास ठार मारण्याची धमकी व पोलिसात खोटी तक्रार करणाऱ्या एस.टी. आगार व्यवस्थापकाविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली आहे.
तालुक्यांमध्ये नुकत्याच पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा सोयगाव, बनोटी, सावळदबारा केंद्रावर घेण्यात आलेल्या होत्या. या परीक्षेसाठी एसटी महामंडळाच्या सोयगाव आगरातर्फे नियमित चालणाऱ्या फेऱ्या बंद करून विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवल्याबाबतचे वृत्त पत्रकार विजय पगारे यांनी एका दैनिकात प्रसिद्ध केले होते. त्यांतर आगार व्यवस्थापक हिरालाल ठाकरे यांनी 15 ऑगस्टला फोन करुन तुम्ही माझी व एसटीची बदनामी झाली, मी तुमच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करतो, बघून घेतो, अशी धमकी दिल्याचे आरोप विजय पगारे यांनी केला आहे. त्यानंतर 19 ऑगस्टला सोयगाव बसस्थानक येथील शिवामृत दूध डेअरी येथे त्यांनी शिवीगाळ करत बसच्या चाकाखाली चिरडून टाकण्याची धमकी दिली. तसेच पैशाची मागणी करत असल्याचे तक्रार दिल्याचेही आरोप पगारे यांनी केला आहे.
या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष भारत पगारे यांच्या नेतृत्वात निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा तसेच विजय पगारे यांना संरक्षण द्यावे, अशा मागणीचे निवेदन रविवारी (दि. 22 ऑगस्ट) सोयगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले असून निवेदनाची एक प्रत पोलीस अधीक्षक कार्यालायसही पाठविण्यात आली आहे.
माझ्यावरील आरोप निराधार - आगार व्यवस्थापक
याबाबत आगार व्यवस्थापक हिरालाल ठाकरे यांना फोन करुन त्यांची प्रतिक्रिया घेतल्यास, मागील आठवड्यात एका वृत्तपत्राने गेल्या काही दिवसांपासून सोयगाव एसटी आगाराबाबत बातम्या प्रकाशित होत्या. त्या बातम्यांमध्ये आगराविषयी करण्यात आलेल्या आरोपाविषयी त्याच्याकडे पुरावे आहेत का ही बाब जाणून घेण्यासाठी मी त्यांना फोन केला होता. माझ्यावर केलेले आरोप हे निराधार असून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांतील आरोपाची शहानिशा करण्यासाठी मी न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. यातून सत्य समोर येईल, असे आगार व्यवस्थापक हिरालाल ठाकरे यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.