छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : किराडपुरा भागात झालेल्या दंगलीनंतर सर्वच पक्षांनी या घटनेत राजकारण नको असे सांगत मात्र एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे स्पष्ट केले. तर या परिस्थितीला सरकार आणि पोलीस जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर दोन एप्रिल रोजी असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला अडथळे आणन्यासाठी, ही परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
दंगल घडवण्याचा प्रयत्न: किराडपुरा भागातील राम मंदिर परिसरात रामनवमीची लगबग सुरू असताना अचानक, अचानक वाद झाला. त्यातून दगडफेक आणि जाळपोळीची घटना समोर आली. पोलीसांची नऊ ते दहा वाहने आणि खाजगी अशी 14 ते 15 वाहने पेटवून देण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी परस्थिती नियंत्रणात यावी यासाठी कारवाई करत गोळीबार केला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. पोलीसांनी काही टवाळखोरांना ताब्यात घेतले आहे. असे कृत्य करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही असा इशारा पोलीसांनी दिला आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत गैरसमज आणि अफवा पसरल्या तर कारवाई करणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी दिला आहे.
आधीच दिली होती कल्पना: या परिस्थितीला पोलीस आयुक्त देखील जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मागील पंधरा दिवसापासून पोलीसांना शहरात एमआयएम आणि भाजपा हे दोन्हीही आपले राजकारण करण्यासाठी परिस्थिती खराब करू शकतात अशी माहिती दिली होती. इतकच नाही तर मंत्रालयात देखील अशा पद्धतीची माहिती दिली होती. मात्र त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच रात्री अशी परिस्थिती घडलेली आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. या हल्ल्यात पोलीस देखील जखमी झाले आहेत. पोलीसांची वाहने जाळण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रकरण गंभीर असल्याने कोणाचीही हाई घाई करू नये आणि दोषींना तातडीने पकडावे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
सभा होऊ नये याकरिता : किराडपुरा भागात घडलेल्या प्रकाराला सर्वस्वी एमआयएम पक्षाचे नेते खासदार इम्तियाज जलील जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. दोन एप्रिल रोजी महाविकास आघाडीची सभा संभाजीनगर जिल्ह्यात होत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते शहरात येतील, ही सभा होऊ नये यासाठी हे कृत्य घडवून आणल्याचा देखील खैरे यांनी सांगितले. एमआयएम आणि भाजपा दोघे मिळून शहराची परिस्थिती बिघडवण्याचा काम करत आहेत. मी 28 वर्ष प्रतिनिधित्व केले मात्र या काळात कुठलीही अप्रिय घटना शहरात आणि जिल्ह्यात घडू दिली नाही. मात्र ज्यावेळी पासून एमआयएम पक्ष जिल्ह्यात आला ही दुसरी दंगल झाली आहे. शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी अरेरावी केली तर, पोलीस लगेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात. मात्र आता पोलीसांवर त्यांच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे, तरी आरोपींना मोकाट का सोडले? त्यांना संध्याकाळपर्यंत अटक करा अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली.
राजकारण करू नका: किराडपुरा येथे गोंधळ घालणाऱ्या लोकांना रात्रीपर्यंत ताब्यात घेतले जाईल. कुठलीही हाई गाई केली जाणार नाही, अस आश्वासन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. मध्यरात्री दोन गटात वाद झाल्यानंतर वाहने राम मंदिर परिसरात जाळण्यात आली. त्यानंतर संदिपान भुमरे यांनी सकाळी परिस्थितीचा आढावा घेत पोलीसांना योग्य ते निर्देश दिले. तर ही वेळ राजकारण करण्याची नाही, विरोधी पक्ष नेत्यांना फक्त भाजप, शिवसेना, एमआयएम यांच्यावर आरोप करण्याचे काम येते. मात्र सध्याची परिस्थिती तशी नाही, त्यामुळे आरोप आणि राजकारण करू नये असे मत संदिपान भुमरे यांनी व्यक्त केले.