औरंगाबाद - छोटा पंढरपूर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या वाळूज येथील विठ्ठल मंदिरात पहाटे खनिकर्म राज्यमंत्री अतुल सावे यांनी सपत्नीक पूजा केली. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांना मंदिर उघडे करण्यात आले. आज सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध भागांतील दिंडी आणि पालखीचे आगमन प्रतिपंढरपुरात झाले. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्रीक्षेत्र छोट्या पंढरपूराची ओळख प्रतिपंढरपूर म्हणून आहे. यामुळे दरवर्षी आषाढी एकादशी यात्रेनिमित्त लाखो भाविकांची मांदियाळी या पवित्र धार्मिक स्थळाला उसळते. गतवर्षीप्रमाणेच यंदाही भाविकांनी छोट्या पंढरपुरात मोठी गर्दी केली.
आषाढी एकादशी यात्रेचे औचित्य साधून राज्यमंत्री अतुल सावे व त्यांच्या पत्नी या दाम्पत्यांच्या हस्ते प्राथमिक विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर विठल-रुक्मिणी मूर्तीस दुग्धाभिषेक आणि जल अभिषेकाने स्नान करण्यात आले. मान्यवर आणि पुजारी यांच्या हस्ते वस्त्र परिधान करून श्रुंगार-मुकुट चढवून आरती करण्यात आली. आरती संपन्न होताच मंदिरातील घंटानाद करून भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले.
यावेळी भाविकांना अनेक सेवाभावी संस्था, मित्र मंडळ आणि दानशूर व्यक्तीकडून साबुदाणा खिचडी, चहा, नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या यात्रेतील भाविकांच्या देखरेखीसाठी पोलीस, व्हिडिओ कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे आदींसह वाहतूक पोलीस विभाग, गुन्हे शाखा विभाग, विशेष शाखा, क्यूआरटीचे पथक आणि खासगी सुरक्षा रक्षकासह मंदिर संस्थानचे शेकडो स्वयंसेवक आदींचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. याचबरोबर भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी १०८ शासकीय रुग्णवाहिका, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारीही भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध होते.
दिंड्या पालख्याचे आगमन
आषाढी एकादशीनिमित्त रात्री बारा वाजेपासूनच जिल्ह्यातील विविध गावातून दिंड्या आणि पालखी निघतात. या पालख्यांमध्ये आबाल वृद्ध, महिलांचा समावेश असतो. या दिंड्या सकाळपासूनच विठ्ठलाच्या गजरात पंढरपुरात दाखल झाले आहेत. यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.