औरंगाबाद - आरोग्य सेवा चांगली असावी असं प्रत्येकाला वाटत असत. शहरी भागात तशी यंत्रणा सज्ज झाली असली तरी ग्रामीण भागात आजही अनेक रुग्णांना उपचारासाठी मोठं अंतर कापावे लागते. यावर उपाय म्हणून कुंभेफळ ग्रामपंचायतीने स्वखर्चाने रुग्णालय उभे केले. जिथे महिला आणि मुलांसाठी मोफत उपचार केले जाणार आहेत.
राज्यातील पहिली ग्रामपंचायत असल्याचा दावा -
ग्रामीण भागात आरोग्य केंद्र असले तरी सुविधांच्या बाबतीत अनेक अडचणी असल्याने गावात वेळेवर उपचार मिळत नाही, त्यामुळे गावातच नागरिकांना प्राथमिक उपचार मिळावे याकरिता कुंभेफळ ग्रामपंचायतीने 56 लाख रुपये खर्च करून स्वतःचे रुग्णालय सुरू केले. इथे महिलांना आणि मुलांना मोफत प्राथमिक उपचार केले जात आहेत. अशी सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत असल्याचा दावा सरपंच कांताबाई मुळे यांनी दिली.
तज्ञ डॉक्टर घेणार तपासणी शिबीर -
कुंभेफळ ग्रामपंचायतीने उभारलेल्या रुग्णालयात एक डॉक्टर आणि दोन सेविका कार्यरत असणार आहेत. त्यांचे वेतन देखील ग्रामपंचायत देणार आहे. महिला आणि मुलांना रात्री बेरात्री उपचार मिळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. इतकंच नाही तर महिलांच्या दुर्धर आजारासाठी महिला रोगतज्ञ आणि मुलांसाठी बालरोग तज्ञ यांचे विशेष शिबीर प्रत्येक महिन्याला आयोजित केले जाणार आहे. आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती ग्रामसेविका संगीता तायडे यांनी दिली.
लवकरच अत्याधुनिक उपचार पद्धती होणार सुरू -
कुंभेफळ ग्रामपंचतीने सुरू केलेल्या रुग्णालयात सध्या प्राथमिक उपचार मिळणार आहेत. गावाची लोकसंख्या कमी असली तरी औद्योगिक वसाहतीचा समावेश परिसरात झाल्याने नवीन लोक वसाहती उभारल्या गेल्याने लोकसंख्या सात ते आठ हजारांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे गावात चांगले उपचार मिळावे याकरिता अत्याधुनिक यंत्रणा भविष्यात सज्ज केली जाणार आहे. त्यासाठी सोनोग्राफी, रक्त तपासणी प्रयोग शाळा उभारली जाणार आहे. रोज दोनशे ते तीनशे रुग्णांची तपासणी शक्य होईल, अशी माहिती उपचार करणारे डॉ. धनंजय भोसले यांनी दिली.
महिलांनी मानले आभार -
कुंभेफळ हे गाव शहरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गावात कोणाला तातडीचे उपचार घेण्याची वेळ आली तर त्यांना शहरातच यावं लागत. त्यात महिला, गरोदर माता, लहान मूल यांना रात्री बे रात्री उपचार घ्यावे लागले तर अडचण निर्माण होत होती. मात्र ग्रामपंचायतीने रुग्णालय सुरू केल्याने मोठी मदत होणार असल्याचे मत गावातील महिलांनी व्यक्त केले.