छत्रपती संभाजीनगर : ऐन निवडणुकीत धनंजय-पंकजा मुंडे यांनी संगनमतानं जमीन लुबाडून फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केलाय. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील गट नं. 240 मधील 63.50 आर जमीन धमकावून आणि कट रचून मुंडे भावंडांनी संगनमतानं घरगड्याच्या माध्यमातून लुबाडल्याचा आरोप सारंगी यांनी केलाय. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळी पोलिसात तक्रार दिली होती. अद्याप गुन्हा दखल झालेला नाही तर दिवाणी न्यायालयात देखील खटला सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
न्यायालयात प्रकरणावर सुनावणी : ऐन निवडणुकीच्या तोंडावरच फसणुकीच्या आरोपाचा मुद्दा का उपस्थित करण्यात आला? या प्रश्नावर सारंगी महाजन यांनी आपण न्यायालयात जाण्याच्या संदर्भाने मुदत संपत असल्याचं सांगितलं. वारंवार याबाबत जाब विचारला होता, मात्र तोडगा न निघाल्यामुळं अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात 18 ऑक्टोबर 2024 रोजी दावा दाखल केला होता. त्यावर, प्रतिवाद्यांना नोटीस बजावली असून 25 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. इतकंच नाही तर परळी शहर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळं येत्या काही दिवसात बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अशी केली फसवणूक : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील विवादास्पद जमीन धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर आणि परळी-बीड मार्गालगत आहे. यातील २७ आर जागा ही शासनाने रस्ते विकास कामासाठी संपादित केलेली आहे. उर्वरीत 36.50 आर जमिनीचा व्यवहार हा धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या संगनमतानं गोविंद बालाजी मुंडे या नोकराच्या माध्यमातून गोविंद माधव मुंडे, तानाजी दशरथ चाटे आणि पल्लवी दिलीप गिते (गोविंद बालाजी मुंडे यांची सून) यांच्या नावे केली. मला परळी येथे बोलावून घेतलं. चांगले पैसे मिळणार असल्याचं सांगून कार्यालयात जाऊन जमीन नावावर केली. परळी सोडताना पंकजा मुंडे यांच्यानावे धमकी देऊन कोऱ्या बाँड पेपरवर सही घेतली. ऑनलाईन पद्धतीनं 22 लाख रुपये दिले, त्यात मध्यस्त असलेल्या व्यक्तीनं कमिशनसाठी त्रास दिला. दोन वर्ष या प्रकरणाचा छडा लावला असता, परस्पर मोठी रक्कम लाटल्याचं आढळून आलं. त्यामुळं आपल्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. यावर तोडगा न निघाल्यास न्यायालयीन लढा देऊ असा इशारा त्यांनी दिलाय.
हेही वाचा -
- मुलुंडमध्ये भाजपा गड राखणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार? जाणून घ्या मतदारसंघाची गणितं
- "ते माझ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार, मी प्रचाराला जाणार," नवाब मलिकांबाबत अजित पवारांची भूमिका स्पष्ट
- उबाठाच्या तीन प्राथमिकता नोकरी . . नोकरी अन् नोकरी; धारावीत उभारणार वित्तीय केंद्र, उद्धव ठाकरेंनी जाहीर केला वचननामा