औरंगाबाद - माणूस मोठा झाल्यानंतर पूर्वीचे दिवस विसरतो, असे म्हटले जाते. मात्र, केनिया परराष्ट्र मंत्री रिचर्ड टोंगी यांनी हा समज खोटा ठरवला आहे. त्यांनी तब्बल ३४ वर्षापूर्वी शहरातील किराणा दुकानदाराची २०० रुपयांची उधारी न विसरता चुकवली आहे. नुकतेच ते भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी औरंगाबादेत येऊन त्या दुकानदाराचे पैसे दिले.
गेल्या ३४ वर्षांपूर्वी रिचर्ड टोंगी केनियाहून औरंगाबादेतील मौलाना महाविद्यालात शिक्षण घेण्यासाठी आले होते. त्यावेळी ते शहरातील वानखेडे नगर येथील गवळी कुटुंबाकडे भाड्याने राहायचे. ते गवळी यांच्या दुकानातून अनेकदा उधारीवर सामान न्यायचे. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उधारीचे दोनशे रुपये देण्यास ते विसरले. मात्र, रिचर्ड यांनी ही गोष्ट स्मरणात ठेवली. मी जेव्हाही भारतात जाईल. त्यावेळी हे पैसे परत करणार असे त्यांनी ठरवले.
आता रिचर्ड केनियाचे खासदार आणि परराष्ट्र मंत्री पदावर आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केनियाच्या शिष्टमंडळाची भेट झाली. यावेळी रिचर्ड देखील भारतात आले होते. रिचर्ड यांनी औरंगाबादेत येऊन गवळी यांचे घर शोधले. मात्र, औरंगाबाद शहरात पूर्वीच्या तुलनेत बदल झाला आहे. त्यामुळे घर शोधण्यात त्यांना २ तास लागले. मात्र, रिचर्ड यांनी हार न मानता गवळी कुटुंबियांना शोधून काढले.
रिचर्ड यांच्याकडे असलेले २०० रुपये गवळी कुटुंबियांच्या लक्षात देखील नव्हते. मात्र, रिचर्ड न विसरता पैसे परत करण्यासाठी आलेले पाहून काशिनाथ गवळी भारावून गेले. गवळी यांनी पैसे घेण्यास नकार दिला. तसेच रिचर्ड आणि त्यांच्या पत्नीला जेवण करण्याची विनंती केली. तसेच परिस्थिती चांगली नसल्याने गवळी कुटुंबियांनी खूप मदत केल्याचे रिचर्ड यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले. हे सांगताना रिचर्ड यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र, अचानक घडलेला हा सर्व प्रकार पाहून गवळी कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला.
गवळी कुटुंबियांमुळेच मला शिक्षण घेता आले - रिचर्ड टोंगी
गवळी यांच्याकडे राहत असताना त्यांनी त्यांच्या दुकानातून अनेक वेळा मला समान उधार दिले. पैश्यांसाठी कधी त्रास दिला नाही. त्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो आणि आज या पदापर्यंत आलो. त्यांचे हे उपकार मी कधी विसरू शकत नाही, असे रिचर्ड टोंगी यांनी ई टीव्ही भारतच्या प्रतिनिधींना सांगितले.