वैजापूर (औरंगाबाद) : लग्न झालेले असतानाही करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीला म्हणजेच मेहुणीला सासरवाडीहून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील धोंदलगाव येथे उघडकीस आली आहे. मेव्हण्याने मेव्हणीला पळवून नेल्यामुळे सासरवाडीतील मंडळी हैराण झाल्याने त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून जावयाची तक्रार केली आहे. याप्रकरणी रंगिल्या जावयासह त्याच्या साथीदारांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुणीला ओढले जाळ्यात : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील एका कुटुंबातील मुलीचे लग्न दीड वर्षापूर्वी तालुक्यातीलच कापूसवाडगाव येथील एकाशी झाले होते. लग्नानंतर जावयाचे नेहमी घरी येणे-जाणे असल्यामुळे त्याचे अल्पवयीन मेव्हणीशी गुफ्तगू सुरू असायचे. 9 मे रोजी मेहुणा धोंदलगाव येथे सासरवाडीला मुक्कामी आला होता. रात्रीच्या सुमारास जावयासह सर्व कुटुंब जेवण आटोपून झोपी गेले. सकाळी संपूर्ण कुटुंब जागे झाल्यानंतर जावयासह त्यांची अल्पवयीन 17 वर्षीय मुलगी घरातून गायब झालेली त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गावातील नातलगांसह आजूबाजूला दोघांचाही शोध घेतला. परंतु, ते सापडले नाही.
सासऱ्यांकडे मागितली खंडणी : 10 मे रोजी जावयाने मित्राच्या भ्रमणध्वनीवरून सासऱ्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून तुमच्या मुलीला मी रात्री 12 वाजता घेऊन आल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मी सध्या पुणे जिल्ह्यातील चाकण येथे असून तिला पुन्हा परत घेऊन येण्यासाठी तुम्ही माझ्या मित्राच्या फोनवर ऑनलाईन दहा हजार रुपये पाठवा. असे सांगितल्यानंतर सासऱ्याने गावातून उसने पैसे घेऊन साडेसात हजार रुपये जमा केले व राजू वायकर ( रा. गणेशनगर ता. संगमनेर जि. अहमदनगर ) याच्या फोनवर पाठविले. त्यानंतर सासऱ्याने वारंवार जावयाला फोन करून मुलीला घेऊन येण्यासाठी आर्जव केले. परंतु, त्याने तिला घेऊन येण्यास टाळाटाळ केली. लग्न करण्याच्या उद्देशानेच जावयाने माझ्या मुलीला पळवून नेले असल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले. मुलीची वाट पाहून कुटुंब कासावीस झाले तरीही जावई मुलीला आणून सोडेनात. त्यामुळे सास-यांनी पत्नीसह तालुक्यातील कापूसवाडगाव येथील जावयाचे घर गाठून व्याह्याकडे आपबीती सांगितली. दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावयासह व त्याच्या मित्राविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावयाचे वडील म्हणाले, "माझ्या मुलाशीच लग्न लावा" : सासू-सासऱ्यांनी मुलीच्या शोधासाठी जावयाचे घर गाठले. परंतु, झाले उलटच, जावयाच्या बापाने झालेल्या प्रकाराबाबत खेद, खंत व्यक्त करण्याऐवजी मुलाच्याच कृत्याला पाठिंबा दिला. तुमच्या मुलीचे लग्न आम्ही आमच्या मुलासोबत लावून घेतो. मुलासोबत नसेल करायचे तर माझ्या भाच्यासोबत मुलीचे लग्न लावून देतो. परंतु, माझ्या दारात तुम्ही पोलिसांना आणले तर तुमचे हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी व्याह्याने दिली. तुमची मुलगी आम्ही पाठविणार नाही. अशी आडमुठेपणाची भूमिका घेतल्यामुळे पती-पत्नीचा नाईलाज झाला आहे. विशेष म्हणजे मुलाचे अगोदर त्यांच्याच मुलीशी लग्न झालेले असतानाही, मुलाचा बाप त्याचे दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे जावयाने मुलगी पळविल्यामुळे तिचे आई-वडील हतबल झाले आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा रंगेल जावयासह मुलीचा किती दिवसांत शोध लावतात. हे मात्र येत्या काही दिवसांत समजणार आहे.