छत्रपती संभाजीनगर : १९ नोव्हेंबर रोजी जागतिक पुरुष हक्क दिनानिमित्त कौटुंबिक समस्याग्रस्त पुरुष आश्रम येथे, शीर्षासन करून 'पुरुष दिन' (International Mens Day) साजरा करण्यात आला. समाजात महिलांवर नाही तर पुरुषांवर देखील अन्याय होत आहे. मागील काही वर्षांमध्ये सरळ मार्गाने न्याय मिळत नसल्यानं, शीर्षासन करून उलटे होऊन न्याय मागण्यात आला. यावेळी पीडित पुरुषांनी केक कापून 'पुरुष दिन' साजरा केला. प्रत्येक वेळी महिलांच्या हक्कांची जाणीव करून देत, 'महिला दिवस' (Womens Day 2023) साजरा करण्यात येतो. तसेच पुरुषांच्या हक्कांची माहिती व्हावी याकरिता हा 'पुरुष दिन' उत्साहात साजरा केल्याची माहिती, संस्थेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी दिली.
पुरुषांवर अन्याय होतोय : जागतिक पुरुष हक्क दिन हा जवळपास ३० देशांमध्ये साजरा केल्या जातो. स्त्री सशक्तीकरण होऊन स्त्रियांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी, यासाठी सर्वच मोठ्या उत्साहाने 'महिला दिन' साजरा करतात. त्याचप्रमाणं पुरुषांना देखील आपल्या अधिकारा विषयी जाणीव होऊन जागरूकता व्हावी. पुरुषांना देखील समाजात मानाचे स्थान मिळावे. यासाठी अनेक मागण्या गेल्या काही वर्षांमध्ये कौटुंबिक समस्याग्रस्त पुरुष संघटनेने केल्या आहेत. पत्नीकडून पतीचा छळ वाढत चाललेला आहे. महिला सबलीकरण करण्याच्या नावाखाली महिलांना पाहिजे त्यापेक्षा जास्त कायदे निर्माण झाल्यामुळं, काही पत्नी आपल्या पतींना कायद्याचा दुरुपयोग करून पतीला शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळं आज पती हा हतबल झाला आहे. सर्व कायदे हे महिलेच्या बाजूनं असल्यानं पुरुषांना त्याचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या परिस्थितीत महिलांचे प्रशासन, न्यायालय ऐकत असल्यामुळं पुरुषांना त्यांच्या हक्काबद्दल बोलण्यासाठी कोणीही समोर येताना दिसत नाही. अशा परिस्थितीत पत्नी पीडित पुरुषांनी कुठे जावं? हा प्रश्न आज पत्नी पीडित पुरुषासमोर उभा असल्याची टिका, कौटुंबिक समस्याग्रस्त पुरुष आश्रमाचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी केली आहे.
पुरुषांसाठी कायदे तयार करावे : पुरुषांवर अन्याय झाल्यास, समाज, पोलीस आणि न्याय व्यवस्था देखील ऐकत नाही. त्यामुळं पुरुष हतबल होत आहेत, काही पुरुष तर आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबत आहेत. पुरुषांचे दर डोई उत्पन्न देखील घटत जाऊन विवाह संस्था धोक्यात आली आहे. अनेकांचा विवाहवरील विश्वास उडत असल्यानं एकतर्फी कायदे रद्द व्हावे. तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करावा. महिलांनी खोटी तक्रार केल्यास त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशा मागण्या अनेक वर्षांपासून करत आहोत. पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता आज कौटुंबिक समस्याग्रस्त पुरुष आश्रम येथे सालाबादाप्रमाणे शीर्षासन करून 'जागतिक पुरुष हक्क दिन' साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. भारत फुलारे, वैभव घोळवे, चरणसिंग गुसिंगे, संजय भांड, प्रवीण कांबळे, विशाल नांदेडकर, विजय नाटकर, सोमनाथ मनाळ यांच्यासह पीडित पुरुष उपस्थित होते.
हेही वाचा -
पुरुषांच्या आत्महत्येत तिपटीनं वाढ, जाणून घ्या का साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय पुरुष दिन