औरंगाबाद (पैठण) : गेल्या दोन दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नद्या-नाल्यांना पूर
पैठण जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यात रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाचे पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पैठण तालुक्यात रविवारी रात्री व दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे नंदी, नाले, तुडुंब भरुन वाहू लागले आहे.
जायकवाडी धरणात 44 टक्के पाणी
नदी व नाल्याचे पाणी गोदावरी नदीपात्रात पोहोचल्याने गोदावरी नदी पात्रावरील हिरडपुरी, आपेगाव बंधारे तुंडुब भरले आहे. या दोन्ही बंधाऱ्यातून 24 हजार क्युसेक्स या वेगाने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. सध्या जायकवाडी धरणात 8 हजार 500 क्युसेक्स या वेगाने पाणी दाखल होत आहे. धरणाची पाणी पातळी 44 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
नागरिकांना दिलासा
पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले. तरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे मराठवाड्यात चिंता व्यक्त केली जात होती. आता दोन दिवसात पाणी पातळीत वाढ झाल्याने पैठणसह संपूर्ण मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - 'रिकामी सिलेंडर घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या हेमा मालिनी, स्मृती इराणी आता कुठे आहेत?'