औरंगाबाद - राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून, सरकारने राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, असे असतानाही औरंगाबादच्या शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी सर्व नियम पायी तुडवत जलवाहिनीच्या उद्घाटनाचा कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात संचारबंदी असल्याने पाचपेक्षा जास्त लोकांना एकाच ठिकाणी जमाव होण्यासाठी बंदी आहे. मात्र, तरीही आमदार शिरसाट यांनी वाळूज परिसरातील बजाजनगरात 40 ते 50 कार्यकर्त्यांसमवेत उद्घाटन केले होते. त्यामुळे शिरसाट यांच्यासह 30 जणांवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पागोटे तपास करत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी करून नये तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी करत आहे. मात्र, असे असतानाही त्यांच्याच पक्षातील नेते या आवाहनाला केराची टोपली दाखवत असेल, तर इतरांनी यावरून काय बोध घ्यावा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.