छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): दिवसभरात इतर रविवारपेक्षा अवघा दहा टक्केच व्यवसाय झाल्याचे व्यवसायिकांनी सांगितलं. शहरात मुख्य बाजारपेठ असलेला निराला बाजार या रविवारी मात्र शांत होता. रविवार म्हणले तर सुट्टीचा दिवस. त्यामुळे परिसरात असलेल्या दुकानांमध्ये चांगली गर्दी पाहायला मिळते. कुटुंबीयांना घेऊन अनेक जण खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या हॉटेल, कपड्याचे दुकान यामध्ये गर्दी ही नेहमीच असते. मात्र आज शहरात असलेल्या राजकीय वर्दळीमुळे सर्वसामान्य ग्राहक बाजारपेठांकडे फिरकले नाहीत. समर्थ नगर येथे भाजपची सावरकर यात्रा, तर काही अंतरावर असलेल्या सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे महाविकास आघाडीचे वज्रमूठ सभा. दोन्ही एकाच परिसरात असल्याने, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर दुसरीकडे वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलामुळे अनेकांनी या परिसरात येणे टाळले. परिणामी ऐन व्यवसाय असलेल्या दिवशी व्यवसायिक शांत बसून होते. दिवसभरात दहा टक्के देखील व्यवसाय झाला नाही, असे मत व्यवसायिकांनी व्यक्त केले; मात्र तर राजकारण्यांसमोर उघडपणे बोलणार कसे, त्रास नको म्हणत अनेकांनी समोर येऊन बोलण्यास टाळले.
दंगलीमुळे व्यवसायिक त्रस्त: गेल्या सहा महिन्यांपासून राजकारणात झालेले बदल यामुळे शहर चांगलंच चर्चेत राहिलं. राजकीय वर्दळ वाढली आहे. मागील काही दिवसांपूर्वी किराड पुरा भागात झालेल्या दंगलीमुळे अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी काहीशी कमी झाली. मागील चार ते पाच दिवसात व्यवसायावर 50 टक्के परिणाम झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे. शहरात नामांतरावरून सुरू असलेली राजकीय परिस्थिती पाहता कधीही गोंधळ होऊ शकतो, अथवा दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात बसली आहे. त्यामुळे गरजेपुरतेच बाहेर यायची भूमिका नागरिकांनी घेतली. मात्र या भूमिकेमुळे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. रोज पेक्षा अर्ध्याहून कमी व्यवसाय होत आहे. त्यात नामांतर विषयावर मोर्चे, सभा, यात्रा यांच्यामुळे राजकारणाशी संबंध नसलेला सामान्य माणूस खरेदीसाठी घराबाहेर येईना. त्यामुळे राजकारण थांबवा असेच काहीसे मत व्यवसायिकांनी व्यक्त केले.
हेही वाचा: Vajramuth Sabha : भाजपला सांगतो, शेंडी-जानव्याचे नाही तर राष्ट्रीयत्व हे आमचे हिंदूत्व -उद्धव ठाकरे