औरंगाबाद - पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना शहराच्या कासम्बरीनगर भागात घडली आहे. नाजनींन उस्मान शेख (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर उस्मान शेख असे आरोपी पतीचे नाव आहे. हत्येनंतर घराला कुलूप लावून आरोपी पती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला.
मागील काही काळापासून पती-पत्नीत वाद होत होते. शनिवारी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, उस्मानने घराबाहेर शेळी बांधण्याच्या दोरीने पत्नी नाजनींनची गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपी पतीने घराला कुलूप लावून छावणी पोलीस ठाण्यात जाऊन, मी पत्नीची हत्या केली आहे. तिचा मृतदेह घरात पडून आहे, असे पोलिसांना सांगितले. त्याचे बोलणे एकून पोलीस चक्रावले. पोलीस उस्मानला घटनास्थळी घेऊन गेले असता पलंगावर नाजनींन मृतावस्थेत पडलेली होती. याप्रकरणी छावणी पोलिसांनी उस्मानला अटक केली आहे. मृत नाजनींन आणि उस्मान या दोघांनी १५ वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. या दाम्पत्याला पाच मुले आहेत.