औरंगाबाद - कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसने औरंगाबादकरांची चिंता वाढवली आहे. मागील काही दिवसांत म्युकरमायकोसिसच्या मृतांची संख्या ही शंभरीपार गेली आहे.
म्युकरमायकोसिसचा मृत्यू दर 10 टक्क्यांवर
म्युकरमायकोसिस या आजाराने मागील महिनाभरातच शंभर जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांमध्ये 3 ते 4 रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच नवीन 15 रुग्णांची भर पडली आहे. आजवर दाखल झालेल्या 910 रुग्णांपैकी 510 जणांची रुग्णालयातून उपचारानंतर सुटी झाली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कळवले आहे.
रोज वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक
म्युकरमायकोसिस आजाराने रोज दोन ते तीन जणांचा मृत्यू होत आहे. औरंगाबाद शहरात आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. कोरोनाबाधित व इतरांना हा आजार होत असून शहर, जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी शहरात रोज दाखल होत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
हेही वाचा - जॉगिंगसाठी जाणाऱ्या तरुणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू