औरंगाबाद - विजप्रवाह असलेली तार तुटून विजेचा धक्का लागून शेकडो मेंढया ठार झाल्याची घटना समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील जैतापूर येथे ही घटना घडली आहे.
जैतापूर शिवारात १५ जूनच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर झाल्टे यांच्या गट नं २९६ शेतात विजेची तार तूटल्याने शॉकसर्किट झाली. यात शंभरहून अधिक मेंढया मृत्यूमुखी पडल्या. नांदगांव, वैजापूर तालुक्यातील वाकला येथील अंबादास शिंगाडे, सुखदेव आयनर, सदाभाऊ शिंदे, यमाभाऊ शिंदे, संजू शिंगाडे या मेंढपाळांच्या या मेंढ्या आहेत. गावाहुन त्यांचा कुभा चरत चरत ते जैतापूर या गावी थांबले होते. या घटनेने या सर्वांचे मोठे नुकसान झाल्याने सर्व कुटुंब हतबल झाले आहे.
या परिसरात अनेक विजप्रवाह करणारे खांब वाकलेले आहेत. काही ठिकाणी तारा लोंबकळत असून त्या दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली होती. मात्र, महावितरणने कुठलीच हालचाल न केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.