औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच महानगरपालिकेने अतिरिक्त झालेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. या निर्णयाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (2 सप्टेंबर) सायंकाळी पालिकेच्या आवारात आंदोलन केले. यावेळी कामगार परत घेण्याची मागणी करण्यात आली.
350 कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात
महानगरपालिकेने आरोग्य विभागातील 350 कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कोविड काळात आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य सेवकांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. मात्र कोरोना आटोक्यात येत असल्याने कोविड सेंटर बंद करण्यात आले. तर अतिरिक्त असलेल्या 350 आरोग्य सेवकांचे काम थांबवण्यात आले आहे. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले असले तरी अचानक कामावरून कमी केल्याने आरोग्य कर्मचारी संतप्त झाले आहेत.
एप्रिल महिन्यापासून वेतन नाही
आरोग्य विभागाच्या या निर्णयाने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. डॉक्टर, नर्स, बॉर्डबॉय, डेटा ऑपरेटर, सफाई कर्मचारी यांना कमी करण्यात आले. इतकेच नाही तर एप्रिल महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे वेतनही थकलेले आहे. कोरोना काळात जीवाची परवा न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोविड सेंटरवर काम केलं. मात्र गरज सरो आणि वैद्य मरो अशी अवस्था झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या कोरोना योद्ध्यांनी महापालिकेच्या मुख्यालयात आंदोलन केले आहे.
हेही वाचा - 'रिकामी सिलिंडर घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या हेमा मालिनी, स्मृती इराणी आता कुठे आहेत?'