औरंगाबाद - नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई)च्या महाराष्ट्रातील केंद्रातून जिम्नॅस्टिक हा प्रकार रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्राची कामगिरी चांगली असतानाही खेळाडूंवर अन्याय करणारा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव मकरंद जोशी यांनी केला.
जिम्नॅस्टिक सारख्या प्रकारात महाराष्ट्रातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केलेली आहे. मागील काही वर्षांमध्ये खेलो इंडिया गेम्समध्येही जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यामुळे आता तरी या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे न करता केंद्राने घेतलेला खेळ रद्द करण्याचा निर्णय राज्यातील खेळाडूंसाठी धक्कादायक असल्याचे जोशी यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांत देशात विविध ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा, नॅशनल गेम्स, खेलो इंडियासारख्या अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह औरंगाबाद विभागातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी दाखवली. पदकतालिकेत अव्वल तीनमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. औरंगाबादच्या साई सारख्या केंद्रात तीनशेहून अधिक खेळाडू नियमित सराव करतात. त्यापैकी अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली आहेत. खेळाडूंची कामगिरी चांगली असताना औरंगाबाद सारख्या ठिकाणचे जिम्नॅस्टिक केंद्र बंद करणे अन्यायकारक आहे. याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच 'साई'च्या दिल्लीतील अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार केला. मात्र, त्याला अद्याप उत्तर मिळालेले नाही, असे मकरंद जोशी यांनी सांगितले.
औरंगाबादच्या साई केंद्रात अनेक खेळांना वगळण्यात आले आहेत. औरंगाबादेतील केंद्र हे पश्चिम विभागातील स्पोर्ट्स अथॉरिटीचे एकमेव जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र आहे. हे केंद्र बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, औरंगाबादचे ‘साई’ केंद्र सुरू राहावेच सोबतच नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्ससुद्धा औरंगाबादसाठी देण्यात यावे, अशी आग्रही मागणी असल्याचे महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव मकरंद जोशी यांनी सांगितले.