छत्रपती संभाजीनगर : गुढीपाडवा म्हटले की, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरावर गुढी उभारली जाते, आकर्षक गुढी उभारताना नवीन संकल्पदेखील केले जातात. मात्र, याच संकल्पनेचा आधार घेत अनोखी प्रथा थेरगाव येथे सुरू करण्यात आली. जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील थेरगावमध्ये मागील 22 वर्षांपूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यात येते. सात दिवस देवाचे नामस्मरण केले जाते.
अखंड हरिनाम सप्ताह : गुढीपाडवा हा सण आठवडाभर गुढी उभारून, हरिनाम सप्ताह शेवटच्या दिवशी अनोख्या पद्धतीने या गुढीपाडव्याची सांगता केली जाते. या गावांमध्ये गुढ्या 8 दिवस घरावर ठेवल्या जातात. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होईपर्यंत गुढी खाली घेत नसून, या गावात आठही दिवस भक्तिमय वातावरण असते. यामध्ये सर्व समाजाचे लोक माणुसकी आणि एकात्मतेचा संदेश जपत सहभागी होतात.
गावातील लोक एकत्र : सण म्हटले की, आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, कुटुंबातील सदस्य जर सोबत नसतील, तर या सोहळ्याला महत्व नसते. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने हरिनाम सप्ताह गावात आयोजित केला जातो. या काळात सात दिवस उत्साहाचे आणि धार्मिक वातावरण गावात निर्माण होते. प्रथा परंपरेनुसार गावात महिला सडारांगोळी काढून वातावरण निर्मिती करतात. स्वतःसाठी हरिभक्त पारायण गुरुजींना आमंत्रित केले जाते.
देवाचे नामस्मरण : सात दिवस वेगवेगळ्या पद्धतीने देवाचं नामस्मरण केले जाते. आनंदाचे क्षणात गावाबाहेर असलेल्या लेकीबाळींसह कुटुंबातील कामानिमित्त बाहेर असलेल्या सदस्यांना गावात बोलावले जाते. एकत्रित पद्धतीने सण साजरा करून आनंदी राहण्याचा प्रयत्न केला जातो. अनोख्या प्रथेला बावीस वर्षे पूर्ण झाली असून, आगामी काळात ही प्रथा कायम ठेवणार असून, काळानुरूप या परंपरेला आणखीन चांगले स्वरूप देत उत्साहात पाडवा आणि सप्ताह साजरा करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा : C-20 Representatives : पेंच सफारीत वाघोबाच्या दर्शनाने भारतात आलेले सी-20 प्रतिनिधी रोमांचित; पाहा फोटो