औरंगाबाद - पंचायत समिती पैठण येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचक त्रासाला कंटाळून बिडकीन येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय शिंदे यांनी मंगळवारी विष घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती. ग्रामसेवक शिंदे यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र गुरुवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी
पैठण पंचायत समिती प्रशासनात सुरू असलेली मनमानी कारभार व सतत वाढत असलेला दबाव, एखाद्या प्रकरणात अडकवण्याच्या दिलेल्या धमक्यांची चौकशी करण्यात यावी, असा संतप्त सूर ग्रामसेवकांमधून आज घडलेल्या घटनेमुळे व्यक्त होत आहे.
अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर शिंदे यांनी उचलले पाऊल
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांनी १८ जानेवारी रोजी बिडकीन ग्रामपंचायतीची अचानक तपासणी केली. तेव्हापासून ग्रामसेवक संजय शिंदे हे प्रचंड तणावात दिसून आले होते. लगेच दुसऱ्या दिवशी संजय हरिभाऊ शिंदे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. यामुळे तालुक्यातील ग्रामसेवक संतप्त झाले आहेत.
पंचायत समिती प्रशासनाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामसेवकांनी केली आहे. खासगी रूग्णालयात जाऊन जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. मात्र आज पहाटे शिंदे यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - वंचितने शिकलकरी समाजाला राजकीय प्रवाहात आणण्याचे काम केले - प्रकाश आंबेडकर
हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी तरुणाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न