औरंगाबाद - घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोनही डोस घेतले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेऊनही कोरोना -
डॉ. कानन येळीकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले होते. 30 जानेवारीला लसीचा पहिला डोस घेतल्यावर मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी दुसरा डोस घेतला होता. मात्र, त्यानंतर त्यांना कोविडसारखी काही लक्षणे आढळून आली. त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन; पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खासगी रुग्णालयातील उपचाराबाबत स्पष्टीकरण -
घाटीच्या अधिष्ठाता असूनही डॉ. कानन येळीकर यांनी उपचार घेण्यासाठी सरकारी रुग्णालयाला प्राधान्य दिले आहे. घाटी रुग्णालयात असलेले सर्व बेड ऑक्सिजनचे आहेत. आणि प्रकृती स्थिर असल्याने ऑक्सिजन बेडची आवश्यकता नसल्याने एक बेड सर्वसामान्य गरजू रुग्णांना उपयोगी पडू शकतो. यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास प्राधान्य दिल्याची माहिती, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
हेही वाचा - गंगापूरमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई