औरंगाबाद - शहराचे माजी महापौर भगवान उर्फ बापू घडामोडे यांच्या हाताला चोराने चावा घेतल्याची घटना घडली. सिडको भागात मोबाईल चोरून पळणाऱ्या चोराला पकडत असताना हा प्रकार घडला. चोराने चावा घेतला तरी घडामोडे यांनी चोराला घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने चोराला पोलिसांच्या स्वाधीन केले.
दोन दिवसांपूर्वी औरंगाबादचे माजी महापौर भगवान घडामोडे आपल्या गाडीतून सिडको परिसरात जात होते. त्यादरम्यान त्यांना दोन युवकांमध्ये भांडण होत असल्याचे दिसून आले. मात्र, काही क्षणात चोर चोर असा आवाज आल्यावर एका चोराने मोबाईल चोरून पळ काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच चोराचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यावेळी चोराने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी घडामोडे यांच्या हाताच्या बोटाचा चावा घेतला.
बोटाला चावा घेतल्याने त्यांना वेदना झाल्या, मात्र चोर पळून जाईल या शंकेने त्यांनी चोराला घट्ट पकडून ठेवले. नंतर नागरिकांच्या मदतीने चोराला पोलिसांच्या स्वाधीन करून गरीब मुलाचा मोबाईल परत केला. आपण जे केले त्याचे समाधान असून चोराने चावा घेतल्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे औरंगाबादचे माजी महापौर भगवान उर्फ बापू घडामोडे यांनी सांगितले.