छत्रपती संभाजीनगर: शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सिडको ठाकरे नगर एन 2 परिसरातील शुभम फायनान्स अँड मल्टी सर्विसेस येथे दोन अज्ञात युवक आले. त्यातील एकाने फायनान्स कंपनीत असलेल्या विलास राठोड यांच्यावर बंदूकीची धाक दाखवत हिंदी भाषेत पैसे निकाल असे म्हणाला. इतकच नाही तर त्याने एक गोळी देखील झाडली. मात्र ती गोळी प्रिंटरला लागली. विलास राठोड यांनी गल्ल्यातील दोनशे रुपये काढून त्याच्या हातात ठेवले, मात्र आणखीन पैसे काढ म्हणत त्याने दुसरी गोळी झाडण्याची तयारी केली. त्याचवेळी बंदुकीतली स्प्रिंग तुटली, आलेल्या आरोपींनी तुटलेली स्प्रिंग आणि तीन जिवंत काडतूस तिथेच टाकून दिली. त्याचबरोबर जाताना फायनान्स कंपनीच्या समोर लावलेल्या गाडीची काच फोडत तिथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
पोलीसांची घटनास्थळी धाव: फायनान्स येथील विलास राठोड यांनी आरोपीतून फरार होता. 112 या टोल फ्री क्रमांकावर पोलीसांना गोळीबार झाल्याची माहिती दिली. काही क्षणात पोलीस तिथे दाखल झाले परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त शिलावंत नांदेडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, मुकुंदवाडी पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे आणि जवाहर नगरचे निरीक्षक वेंकटेश केंद्रे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना फायनान्स ऑफिसमध्ये बंदुकीची तुटलेली स्प्रिंग आणि तीन जिवंत काडतूस आढळून आले. त्यांनी तातडीने घटनाक्रम जाणून घेत तपास कार्य सुरू केले.
सीसीटिव्ही तपास सुरू: गोळीबार केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. त्यावेळी शेजारी असलेल्या फायनान्स कंपनी कार्यालयाच्या बाहेरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात दोन्ही आरोपींच्या हालचाली कैद झाल्या. दोघांनी आपला चेहरा दिसणार नाही याची काळजी घेत लुटण्याचा प्रयत्न केला. हे दोघे आरोपी ज्या दिशेने आले आणि ज्या दिशेला गेले त्या सर्व भागातील सीसीटीव्ही पोलीसांनी तपासायला सुरुवात केली आहे. आरोपी लवकर पकडले जातील असा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला.
हेही वाचा: Nanded Crime नांदेडमध्ये पुन्हा व्यापाऱ्यावर गोळीबार आरोपी बाप अन् मुलगा पोलिसांना शरण