औरंगाबाद - लॉकडाऊनमुळे शेतीमाल विक्री आणि पुरावठ्याची साखळी विसकळीत झाली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कन्नड़ तालुक्यातील बहिरगाव येथील आशिष दापके या शेतकऱ्याचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. दापके परिवाराने मोठ्या श्रमाने पिकवलेले पत्ता-कोबीचे पीक व टोमॅटोला लॉकडाऊनमुळे वेळेवर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे, त्यांनी तीन एकर पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.
कन्नड तालुक्यातील बहिरगावला आदर्श गाव म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या गावातील प्रत्येक शेतकरी प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखला जातो. या बहिरगाव शिवारातील आले, कोबी, टोमॅटो या फळभाज्या प्रसिद्ध आहेत. या वर्षी चांगला पाऊसही झाला. त्यामुळे, गावातील शेतकरी समाधानी असतानाचा कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आणि शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले.
बहिरगाव येथील दापके कुटुंबानी पत्ता-कोबीसाठी 25 हजार रूपये खर्च केला होता. तर, टोमॅटोसाठी 1 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. दोन्ही पिकांसाठीची रोपे, रासायनिक व मिश्र खते, कीटकनाशके, मशागत तसेच मजूरी असा साधारण 2 लाखांपर्यंत त्यांनी खर्च केला होता. याचे उत्पादन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झाले. जूनपर्यंत ते कायम राहिले असते. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाले आणि दापके कुटुंबाच्या अपेक्षेवर पाणी फिरले. 10 ते 15 लाखाच्या उत्पादनाची अपेक्षा असलेल्या या कुटुंबाला उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागला.