गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी कांदा कमी दराने खरेदी करत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर शेतकरी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने एकच गोधळ उडाला होता. अन्य बाजारपेठे पेक्षा सुमारे २०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल कमी दराने व्यापारी कांदा खरेदी करत असल्याचा आरोप करत प्रचंड गोंधळामध्ये शेतकऱ्यांनी हा लिलाव बंद पाडला.
गंगापूर ,वैजापूर महामार्गावर काही काळ शेतकऱ्यांचा ठिय्या
लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या समोरील गंगापूर वैजापूर महामार्गावर एकत्र येत ठिय्या दिला. काही काळासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
कमी दराने खरेदी सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल १५०० ते १७०० पर्यंत भाव मिळत आहे. मात्र गंगापूर बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्यांला दोनशे ते चारशे रुपये क्विंटलमागे कमी भावाने कांद्याची बोली बोलून कांदा खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. व्यापारी संगनमत करून शेतकऱ्यांचा कांदा कमी दराने खरेदी करत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. पोलीस प्रशासन बाजार समितीच्या मध्यस्थीने तब्बल चार तासानंतर लिलावास सुरुवात झाली.
हेही वाचा - दिलासादायक! जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही