औरंगाबाद - अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला जाब विचारण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी नेत्यांना पोलिसांनी रस्त्यातच ताब्यात घेतलं आहे. केंद्रीय पथकाच्या दौऱ्याला विलंब झाल्याने, शेतकरी आक्रमक झाले आहेत. आता कोणते नुकसान पाहाणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दोन महिन्यानंतर पथक आल्याने शेतकरी संतप्त
सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागलं. राज्य सरकारने पाहणी करून अहवाल केंद्राकडे पाठवला, त्यावेळी तात्काळ पथक आले असते तर शेतातील खरी परिस्थिती पाहायला मिळाली असती. मात्र तस झालं नाही केंद्राचे वराती मागून घोडे पाहायला मिळत असल्याने आम्ही जाब विचारणार होतो. मात्र पोलिसांनी कारवाई केली, आम्ही या पथकाचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया गंगापूर येथील शेतकरी संतोष जाधव यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे 25 लाख हेक्टर शेतीचे नुकसान
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 25 लाख 46 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 36 लाख शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती सोबत दोन हात करत असलेला शेतकरी सरकारी मदतीकडे आस लावून बसला होता. मात्र जून ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेले पिकांचे नुकसान बघण्यासाठी केंद्र सरकारला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस जाग आली आहे. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पीके काढून टाकले आहेत, तसेच पुढील पेरणीसाठी मशागतीचे काम सुरू केले आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय पथक नेमकं कशाची पाहणी करण्याकरता आले आहे. शेतात पिकं उभी असताना झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक का आले नाही? राज्यातील खासदारांनी केंद्राकडे यासंदर्भात पाठपुरावा का केला नाही? याबाबत जाब विचारण्यासाठी शेतकरी जात होते. मात्र सिल्लेगाव पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं असून, सरकार आणि पोलीस शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप शेतकरी नेते संतोष जाधव यांनी केला आहे.