छत्रपती संभाजीनगर : वेगाने प्रवास व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग काम गतीने करण्यात आले. मात्र यावेळी रस्ता चांगला झाला मात्र त्याच्या संबंधित असलेली इतर काम झाले नसल्याचे दिसून आले. मुसळधार पावसात महामार्गावर साचलेल पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे वैजापूर तालुक्यात पाहायला मिळाले. कांद्याच्या चाळीमध्ये पाणी गेल्याने संताप्त शेतकऱ्याने चक्क महामार्गाच्या टोलनाक्यावर ट्रॅक्टर आडवे लावत गोंधळ घातला, ही घटना वैजापूर येथील जांबरगाव शिवारात घडली.
शेतात पाणी गेल्याने कांद्याचे नुकसान: जांबरगाव येथील टोलनाक्याजवळ भोसले व साठे यांच्या शेतजमिनी आहेत. गुरुवार रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे समृद्धीवरील पाणी हे सदरील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसले. यामध्ये शिवारातील गट क्रमांक 31 मधील सुनील कारभारी भोसले, जनार्दन मुरलीधर भोसले, पोपट साहेबराव भोसले, दीपक जनार्दन भोसले, तर गट क्रमांक 50 मध्ये देविदास मधुकर साठे, राजेंद्र दौलत साठे या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये समृद्धीवरून येणारे पाणी शिरले. हे पाणी त्यांच्या चाळीमध्ये गुडघाभर साचल्यामुळे चाळीमधील संपूर्ण कांदे भिजले. या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संपूर्ण घटनेमध्ये या शेतकऱ्यांच्या चाळीमधील 500 ते 600 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या शेतकऱ्यांना आता आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
नुकसान भरपाई द्या: कांद्यात पाणी गेलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर समृद्धी महामार्गाच्या टोलवर आणून लावले. ज्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, तर प्रसंगी शेतकऱ्यांनी अगोदरच आम्ही शेतीमालाच्या भावाने कंटाळलेलो असून आता तुम्ही आमच्या शेतामध्ये पाणी सोडून आमचे मोठे नुकसान केले आहे. याची नुकसान भरपाई द्या असे म्हणत रस्ता बंद केला. ज्यामुळे समृद्धी महामार्गावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच अडचण झाली. महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांची संपर्क साधला तर प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यांना यापुढे पाणी येणार नाही असे आश्वासन दिले, पोलिसांनी समजावल्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतली आणि ट्रॅक्टर बाजूला काढले.
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी : मात्र नियोजनबद्ध असलेल्या या समृद्धी महामार्गाचे पाणी हे या शेतकऱ्यांच्या शेतात कसे घुसले, याबाबत विचारणा केली असता संबंधित शेतकऱ्यांनी महामार्गाला लागून असलेल्या सर्विस रोडला नाल्या आहे, या नालाचे काम अपूर्ण असल्याने हा सर्व प्रकार घडला. शेतात पाणी घुसले सोबतच हे पाणी आमच्या कांदा चाळीत देखील गेले, ही ठेकेदाराची व प्रशासनाची चूक आहे, ज्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई देणे ही त्यांची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलक शेतकरी देविदास साठे यांनी दिले आहे.