औरंगाबाद - ऊसाच्या थकीत पैशांसाठी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.
पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याला ऊस दिला होता. १५ महिने उलटूनही ऊस उत्पादकांची वाढीव बिले मिळाले नाहीत. वारंवार चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ९ जुलै रोजी उपोषणाचा इशारा विभागीय साखर यांना इशारा दिला होता. त्यानुसार आज आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी निवेदन घेण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयात एक सुद्धा आधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध केला. शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पैठण तालुक्यातील मायगाव, वडवली या गावातील शेतकरी उपस्थित होते.