छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Vishnu Manohar : अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी देशातील वेगवेगळ्या महंतांच्या हस्ते पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या दिवशी सर्वांचं तोंड गोड करण्यासाठी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर पाच हजार किलोचा हलवा तयार करणार आहेत. त्यासाठी दोन-तीन वेळा प्रात्यक्षिक घेण्यात आलंय. तसंच एक दिवस आधी त्याबाबतची तयारी करून अवघ्या दोन तासात 5000 किलोचा हलवा तयार केला जाणार आहे. या हलव्यात एक हजार किलो शुद्ध तूप वापरण्यात येणार आहे. हा देखील एक वेगळा उपक्रम असणार आहे.
प्रत्येक वेळी खिचडी तयार करत असलो तरी प्रसादाचा शिरा तयार करणे हे थोडसं अवघड काम आहे. त्याबाबत केंद्र सरकारच्या वतीनं परवानगी घेतली आहे. यासाठी एक विशिष्ट जागा निश्चित करण्यात आली असून त्या ठिकाणीच आम्ही हलवा तयार करून भक्तांना देणार आहोत. हे माझं भाग्य आहे, देवाच्याच कृपेनं मी वेगवेगळे विक्रम करू शकतो - विष्णू मनोहर, शेफ
6500 किलो खिचडी केली तयार : खिचडी तयार करण्यात वेगवेगळे विक्रम तयार करणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी एम. जी. एम. येथे पुन्हा एकदा नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. अवघ्या तीन तासांमध्ये साडेसहा हजार किलोची तांदळाची खिचडी त्यांनी तयार केली आहे. या खिचडीत त्यांनी मूगडाळ - 200 किलो, तूर डाळ - 200 किलो, हरभरा डाळ - 100 किलो, तांदूळ - 1000 किलो, शेंगदाणे - 200 किलो, कोबी - 300 किलो, गाजर - 300 किलो, कांदा - 300 किलो, कोथंबिर - 100 किलो, तेल - 225 लीटर, तूप - 75 किलो, मीठ - 100 किलो, हळद -50 किलो, मिरची -100 किलो, गरम मसाला - 50 किलो, दही - 300 किलो, साखर - 100 किलो, पाणी - 3000 लीटर इत्यादी वापरण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
खिचडीला राष्ट्रीय खाद्य घोषित करा : खिचडी शरीरासाठी पौष्टिक मानली जाते. यात तांदळासोबत वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून चविष्ट पदार्थ तयार केला जातो. त्यामुळेच खिचडीला राष्ट्रीय खाद्यपदार्थ घोषित करावा अशी मागणी विष्णू मनोहर यांनी केली आहे. खिचडीची लोकप्रियता वाढावी यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे विक्रम करत असतो. याआधी नागपूर, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे विक्रम आपण तयार केले आहेत. त्यात आता साडेसहा हजार किलो खिचडी तयार करून एक वेगळा विक्रम करण्यात आलाय. ही खिचडी तयार झाल्यावर शहरातील वेगवेगळे वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि गोरगरिबांना मोफत वाटली जात असल्याची माहिती विष्णू मनोहर यांनी दिली.
हेही वाचा-