औरंगाबाद - जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हरीसिद्धी देवीच्या जत्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जत्रेतील कुस्त्यांचा फड प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
हर्सुलचे ग्रामदैवत असलेल्या हरीसिद्धी देवीच्या जत्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. भाविकांच्या मनोरंजनासाठी जत्रा समितीतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. जत्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी देवीची विधिवत पूजा करण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये रंगणार 'डायमंड कप इंडिया' आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा
जत्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या कुस्त्यांचा आखाड्यात सुमारे दोनशे मल्लांनी सहभाग घेतला. दिवसभर सुरू असलेला कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी आसपासच्या गावातील दर्शकांनी गर्दी केली होती. यावर्षीच्या आखाड्यात महाराष्ट्र केसरी बाला रफिक हा सर्वांचे आकर्षण राहिला. स्थानिक मल्लांसोबतच राज्याबाहेरील मल्लांनीही सहभाग नोंदवला. जत्रेच्या पुढील दोन दिवसांमध्ये घोड्यांचा नाच आणि मोटारसायकल शर्यतीचा थरार लोकांना अनुभवायला मिळणार आहे.